लातूर – लातूर येथील प्रसिद्ध किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद घुगे यांनी दवाखान्याचे सिक्युरिटी सुपरवायझर बाळू डोंगरे यांची बेदम मारहाण करून हत्या केल्याचे उघडकीस आली. या घटनेतील डॉक्टर आणि डॉक्टरचा एक साथीदार अनिकेत मुंडे सध्या फरार आहेत. तर याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून फरार डॉक्टरचा शोध सुरु आहे.
बाळू डोंगरे हा सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून आयकॉन हॉस्पिटल लातूर येथे कार्यरत होता. डॉ. प्रमोद घुगे या हॉस्पिटलचे संचालक आहेत. घुगे हे ठरवलेले पैसे देत नव्हते. यावरून बाळू डोंगरे आणि प्रमोद घुगे यांच्यात सातत्याने वाद होत होते. ११ डिसेंबरला मध्यरात्री बाळू डोंगरे हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्या ठिकाणी डॉक्टर आणि बाळू डोंगरे यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला. यावेळी डॉ. प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंढे यांनी त्याला मारहाण केली. त्यात बाळू डोंगरे यांचा मृत्यू झाला. मात्र डॉक्टर घुगे यांनी बनाव रचून तो गाडीवरून पडल्याने जबर मार लागला असून त्यास आयसीयूमध्ये ऍडमिट केल्याचे सांगितले. त्यानंतर डोंगरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला, असे नातेवाईकांना खोटे सांगितले.
दरम्यान, बाळू डोंगरे यांचा मृतदेह काल दुपारी नातेवाईकांनी ताब्यात घेतल्यानंतर डोंगरे यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळल्या. डोंगरे यांच्या शरीरावर अपघातानंतरच्या जखमांच्या वाटत नसल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. बाळू डोंगरे यांचा खून झाल्याचा संशय आल्याने डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. आज सकाळी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या संख्येने डोंगरे यांचे नातेवाईक जमा झाले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदनाला परवानगी दिली.