पुणे- जिल्ह्यातील खडकवासला प्रकल्पातील खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत करण्यात येणार्या बोगद्याचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे.सध्या या बोगद्याचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली पर्यावरण मान्यता घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
त्याचबरोबर बांधकाम आराखडा म्हणजेच व्हर्टिकल शाफ्ट आणि अॅक्सिस ऑडिट स्थान निश्चितीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा याचे कामकाज सुरू असून, ही सर्व कामे खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा उजवा कालव्याच्या फुरसुंगी बोगदा प्रकल्पाला या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी २,१९० कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या बोगद्यामुळे पुणे परिसरास सिंचन आणि पिण्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.