कोल्हापूर-कटिहार विशेष रेल्वेचा भव्य शुभारंभ

कोल्हापूर – उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर ते कटिहार (बिहार) या मार्गावर सुरू करण्यात आलेल्या विशेष साप्ताहिक रेल्वेचा शुभारंभ काल कोल्हापुरातून झाला. मध्य रेल्वेच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात आली असून, कोल्हापूरकरांना उत्तर भारताशी थेट जोडणारा हा प्रवास आता अधिक सुलभ होणार आहे. या गाडीचे उद्घाटन कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन, अरिहंत जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल, बाबासाहेब कोंडेकर आणि शिवनाथजी बियाणी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

ही विशेष गाडी कोल्हापूर–कटिहार आणि कटिहार–कोल्हापूर मार्गावर प्रत्येकी चार फेऱ्या करणार आहे. सांगली, पुणे, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, प्रयागराज छावनी, अयोध्या जंक्शन, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि बेगुसराय या प्रमुख स्थानकांवर थांबे असल्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सर्व फेऱ्यांचे आरक्षण आधीच पूर्ण झाले असून या गाडीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मार्गावर कायमस्वरूपी रेल्वे सुरू करण्याची मागणीही प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.