नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान दरम्यान तणाव अधिकाधिक वाढत चालला आहे. एकीकडे भारताने दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. प्रतिउत्तराचा इशारा दिला आहे. आज आणखी चार दहशतवाद्यांशी संबंधितांची काश्मीरमधील घरे उद्ध्वस्त केली आहेत. पाकिस्तान मात्र अरेरावी कमी करत नाही . आधी पुलवामा येथे झालेला हल्ला आणि आता पहलगाम येथे झालेला हल्ला हे दोन भयंकर हल्ले भारतानेच घडवून आणले, असा दावा पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर-ए-तोयबाची संघटना टीआरएफने केला आहे .
भारतात दहशतवाद्यांविरुध्दची मोहीम तीव्र करत भारतीय लष्कराने अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि शोपियान येथे धाडी टाकून आणखी चार दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त केली. लष्कराने काल लष्कर-ए-तोयबाच्या असिफ शेख आणि अदिल ठोकर या संशयित दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त केली. अदिल ठोकरचे घर आयईडीच्या स्फोटाने उद्ध्वस्त करण्यात आले होते. तर असिफचे घर बुलडोझरच्या सहाय्याने भुईसपाट करण्यात आले होते. लष्कराने ही धडक कारवाई चालूच ठेवली असून, आज बिजबेहरा, पुलवामा, कुलगाम आणि शोपियान येथील शोधमोहिमेदरम्यान लष्कर-ए-तोयबाचा हारिस अहमद (छोटीपुरा, शोपियान), जैश-ए-महंमदचा अहसान- उल-हक (मुरान), झाकीर अहमद गनी (मतलहमा, पुलवामा), शाहिद अहमद यांची घरे स्फोटात उद्ध्वस्त केली. यापैकी जैश-ए-महंमदचा अहसान हा 2018 साली पाकिस्तानमधून घातपाती कारवायांचे प्रशिक्षण घेऊन परतला आहे, अशी माहिती लष्कराला मिळाली आहे. विमानवाहू नौका सज्ज असल्याचे फोटो पोस्ट केले. लष्करानेही सैन्य सज्ज असल्याची पोस्ट केली.
भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. 1960 चा सिंधु पाणीकरार स्थगित करण्याचा निर्णय हा त्यातील एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या निर्णयामुळे धास्तावलेले पाकिस्तानी नेते आता भारताला धमकावू लागले आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आणि पाकिस्तानचे माजी पराराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या अशाच एका चिथावणीखोर भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सिंधु पाणीवाटप करारावरून भुट्टो भारताला धमकावताना दिसत आहेत. सिंधु नदीतून एकतर आमच्या हक्काचे पाणी वाहिल नाहीतर त्यांचे रक्त, अशा शब्दांत बिलावल भुट्टो यांनी भारताला धमकावले आहे.
मी भारताला जाहीरपणे सांगू इच्छितो की, सिंधु नदी आमची आहे आणि आमचीच राहणार आहे. या नदीच्या पाण्यावर आमचाच हक्क आहे. भारताने सिंधूचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील. सिंधू नदीतून एकतर आमच्या हक्काचे पाणी वाहील किंवा त्यांचे (भारतीयांचे) रक्त वाहील, अशी उघड धमकी बिलावल भुट्टो यांनी दिली. संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी म्हटले की भारतानेच हल्ले घडवून आणले आहेत.
पहलगाम हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. जगभरातील भारतीय नागरिक पाकिस्तानचा धिक्कार करत आहेत. लंडनमध्येही भारतीय नागरिक पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या बाहेर निदर्शने करीत होते. त्यावेळी लंडनमधील पाकिस्तान संरक्षण डिप्लोमॅट कर्नल तैमूर राहत हे हातात हवाई दलाचा भारतीय जवान अभिनंदन वर्धमान यांचे छायाचित्र घेऊन इमारतीच्या गच्चीत आले. त्यांच्या हातातील अभिनंदन यांच्या छायाचित्राखाली चाय इज फॅन्टास्टीक असा भारतीयांना डिवचणारा संदेश लिहिला होता. हे छायाचित्र दाखवत कर्नल तैमूरने गळा कापण्याची खूण केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीयांचा संताप अधिकच उफाळून आला.
भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल हवाई दलाने बालाकोट हवाई हल्ला केला.त्यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडले. मात्र या कारवाईत त्यांचेही विमान पडले आणि अभिनंदन जखमी अवस्थेत पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले होते. भारत सरकारच्या दबावामुळे पाकिस्तानी सैन्याने त्यांची सुटका केली. पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अभिनंदन यांना तुरुंगातील त्यांच्या अनुभवाबद्दल विचारले असता अभिनंदन यांनी म्हटले होते की, त्यांनी मला चहा दिला, तो उत्तम होता (दे ऑफर्ड मी टी, इट वॉज फॅन्टॅस्टीक). अभिनंदन यांच्या त्या विधानाचा संदर्भ देत कर्नल तैमूर यांनी त्यांच्या छायाचित्रावर चाय इज फॅन्टॅस्टीक अशा ओळी लिहून भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला. अभिनंदनचा आम्ही गळा चिरू शकलो असतो, पण त्यांना चहा देऊन परत पाठवले, असा गर्भीत इशारा तैमुर यांनी दिला. दरम्यान आम्ही हल्ला केला नाही असे पत्रकच लष्कर-ए-तोयबाची संघटना टीआरएफ यांनी जारी केले. आमचे अकाऊंट हॅक करून हल्ल्याचा दोष आमच्यावर मारला असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने ड्रोन हल्ला होऊ नये म्हणून सीमेवर जॅमर बसवून मोबाईल सेवा बंद केली आहे.
आज भारतीय नौदलाने लष्कर-नौदलाची सूचक पोस्ट
पहलगाम हल्ल्यानंतर देशात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि नौदलाने आज सूचक पोस्ट केल्या आहेत. अधिकृत एक्स खात्यावरील या दोन्ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
नौदलाने एक्सवर पाच युद्धनौकांचा एकत्र फोटो पोस्ट करून त्यावर पॉवर इन युनिटी, प्रेझन्स विथ पर्पज म्हणजेच एकतेच्या बळावर, ध्येयाच्या दिशेने ठाम उपस्थिती अशी सूचक पोस्ट केली आहे. तर भारतीय लष्कराने सदैव सज्ज, सदैव सतर्क! या ओळींसह एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याच लष्करातील जवानांची चित्तथरारक प्रात्यक्षिक दिसतात.
14 दहशतवाद्यांची यादी जाहीर
गुप्तचर संस्थांनी केंद्रशासित प्रदेशात सक्रियपणे कार्यरत असलेल्या 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. त्यात आदिल रहमान दंतू (21), आसिफ अहमद शेख (28), अहसान अहमद शेख (23), हरीस नजीर (20), अमीर नजीर वानी (20), यावर अहमद भट, आसिफ अहमद खांडे (24), नसीर अहमद वानी (21), शाहिद अहमद कुटे (27), अमिर अहमद दारून (27), अमिर अहमद दारून (27), अमिर अहमद दारून (33), अमिर नजीर वानी (20) अशी या व्यक्तींची नावे आहेत. रशीद गनई (32) आणि झाकीर अहमद गनी (29) यांचा समावेश आहे.
टीआरएफने जबाबदारी नाकारली
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबाचा गट असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) स्वीकारली होती. मात्र, चार दिवसांनंतर या हल्ल्याशी आमचा संबध नाही, असे म्हणत या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे. शिवाय भारतानेच सोशल मीडिया अकाऊंट हॅक केल्याचा आरोप केला आहे. टीआरएफने एक पत्रक प्रसिद्ध करून म्हटले आहे की, पहलगाम हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. ही जबाबदारी आमच्या कोणत्याही अधिकृत सदस्याने घेतलेली नाही. आमची वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक करण्यात आले होते. हे हॅकिंग भारतातूनच झाले असेल, असा आम्हाला संशय आहे. कारण अशा प्रकारचे प्रयत्न भारत याआधीही करत आला आहे.
टीआरएफने 2000 सालातील छत्तिसींगपूरा घटनेचा, 2001 मधील संसदेवरील हल्ल्याचा आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत दावा केला की, या घटनांवेळीही भारताने स्वतःच कारस्थान रचले होते. आमचा लढा हा काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आहे. आमचा अंदाधुंद हिंसाचाराला विरोध आहे. आमची कारवाई ही नैतिक आणि अन्यायाविरुद्ध असते. भारत मात्र निर्दोष काश्मिरींना लक्ष्य करतो, त्यांची घरे उद्ध्वस्त करतो.
