काँग्रेसने गणपती बाप्पाला तुरुंगात टाकले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा आरोप

वर्धा – गेले काही दिवस काँग्रेसवर सतत अत्यंत जळजळीत टीका करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथील जाहीर सभेत गणपती पूजेवरून काँग्रेसवर हल्ला चढवला. गणेशोत्सवात सरन्यायाधीशांच्या घरी दर्शनाला जाण्यावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर टीका केली होती. यावरून मोदी म्हणाले की, मी सरन्यायाधीक्षांच्या घरी गणपती पूजेला गेल्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखले. काँग्रेसला गणपती पूजेबद्दल प्रचंड चीड असून, या पूजेला काँग्रेसचा विरोध आहे. म्हणूनच काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये लोक गणपती मूर्तीची पूजा करत होते, त्यावेळी गणपतीची मूर्ती कर्नाटक पोलिसांनी गजाआड केली. गणपतीच्या या अपमानामुळे पूर्ण देशात आक्रोश आहे. विशेष म्हणजे, कर्नाटकमधील घटनेमागचे सत्य काही वेगळेच असताना मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी बेधडक तिचा वापर केला.
विश्वकर्मा योजनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने आज वर्ध्यात पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी गणपती पूजनावरून काँग्रेसवर आरोप केले. ते म्हणाले की, मी सरन्यायाधीशांच्या घरी गणेश पूजेला गेल्यावर काँग्रेसने लगेच तुष्टीकरण सुरू केले. लांगूलचालनासाठी काँग्रेस सध्या काहीही करत आहे. महाराष्ट्राची भूमी याची साक्षीदार आहे की, स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात गणपती उत्सव महाराष्ट्राच्या एकतेचा उत्सव बनला होता. गणेशोत्सवात प्रत्येक समाज, प्रत्येक वर्गातील लोक एकत्र येत होते. मात्र काँग्रेसला गणेशोत्सवाचा तिरस्कार आहे. ज्या पक्षात आपल्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा थोडासाही सन्मान केला जात असेल, तर तो पक्ष कधीच गणपती पूजेचा विरोध करू शकत नाही. पण काँग्रेसला गणपती पूजेची चीडच आहे. महाराष्ट्र गणपतीची आराधना करत असताना काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये लोक गणपतीच्या मूर्तीची पूजा करत होते. त्यावेळी कर्नाटक पोलिसांनी बाप्पाला तुरुंगात टाकले. याबाबतीत काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या तोंडांनाही टाळे लागले आहे, याचे मला आश्चर्य वाटते. त्यांच्यावरही काँग्रेसच्या संगतीचा असा काही परिणाम झाला की, गणपतीच्या अपमानाला विरोध करण्याची त्यांच्यात हिंमतच राहिलेली नाही.
13 सप्टेंबर रोजी मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे बुधवारी रात्री आठ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यानंतर दोन गटांत दगडफेक, गोळीबार आणि जाळपोळीची घटनाही घडली. या घटनेमुळे मंड्या जिल्ह्यात तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गणेशमूर्ती ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये ठेवली. तिचे विधिवत विसर्जनाची व्यवस्था केली. मात्र, मोदी यांनी या घटनेचे अर्धसत्य कथन करून काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदी पुढे म्हणाले की, ज्या काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या मित्रांनी शेतकर्‍यांना बर्बाद केले. त्यांना परत संधी द्यायची नाही. खोटे बोलणे, फसवणूक करणे आणि बेईमानी करणे हा काँग्रेसचा मूळ उद्देश आहे. निवडणुकीदरम्यान काँग्रेसने तेलंगणात शेतकर्‍यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. त्यांचे तेलंगणात सरकार आले. मात्र त्यांनी शेतकर्‍यांचे कर्ज माफ केलेच नाही. देशातील सर्वात भ्रष्ट पार्टीचे कुटुंब म्हणजे काँग्रेसचे शाही कुटुंब आहे. त्यामुळे काँग्रेसपासून सावध राहा. त्यांना पुन्हा सत्तेत येण्याची संधी देऊ नका. नाही तर ते पुन्हा तुम्हाला बर्बादीकडे घेऊन जातील. आज जी काँग्रेस आहे, ती महात्मा गांधी यांची काँग्रेस नाही. आजच्या काँग्रेसमध्ये देशभक्तीचा आत्मा मेला आहे. आजच्या काँग्रेसमध्ये द्वेषाचे भूत आहे. आज काँग्रेसच्या लोकांची भाषा पाहा. परदेशात जाऊन त्यांचा देशविरोधी अजेंडा सुरू आहे. समाजाला तोडणे, देशात फूट पाडण्यावर ते बोलत असतात. तुकडे तुकडे गँग आणि अर्बन नक्षली लोक काँग्रेस चालवत आहेत. काँग्रेस देशातील सर्वात भ्रष्ट आणि बेईमान पार्टी आहे. त्यांनी एससी, एसटी, ओबीसी समाजातील लोकांकडे दुर्लक्ष केले. काँग्रेसने या घटकांना जाणूनबुजून मागे ठेवले. आम्ही या मागासवर्गीय विरोधी मानसिकतेला दूर केले. विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक फायदा एससी, एसटी आणि ओबीसीला मिळाला. महाविकास आघाडीने कापसाला शेतकर्‍यांची ताकद बनवण्याऐवजी त्यांची उपेक्षा केली. मविआने केवळ भ्रष्टाचारच केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top