मुंबई – आज अत्यंत दिमाखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजपाशासित राज्यांचे डझनभर मुख्यमंत्री, अनेक कलाकार व विविध क्षेत्रांतील मान्यवर व साधूसंत उपस्थित होते.
आज एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. मात्र त्यांनी मागितलेले गृह व नगरविकास खाते त्यांना मिळेल की नाही याबाबत अद्यापही निश्चित नाही. आजच्या शपथविधीनंतर पुन्हा मंत्रिपदांबद्दल प्रदीर्घ चर्चा सुरू राहील, असे चित्र आहे. 16 डिसेंबरला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन असून, त्याआधी 11 डिसेंबरपर्यंत काही मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे सांगितले जाते. मात्र खात्यांचा घोळ अजून सुरू असल्याने हा प्रश्न लवकर सुटेल अशी चिन्हे नाहीत.
आज सकाळपासून मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांची लगबग सुरू होती. त्यांच्या सागर बंगल्यावर आमदारांची रीघ लागली होती. दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवीला जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. मुंबादेवीचेही दर्शन घेतले. त्यानंतर सागर बंगल्यावर गोमातेचे पूजन केले. एकूणच तयारी सुरू होती. आझाद मैदानावर शपथविधीला जाण्यापूर्वी त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन अमित शहा व जे.पी. नड्डा यांचीही भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरही जल्लोषाचे वातावरण होते. भेटीगाठी, नाचगाणी सुरू होती. मात्र वर्षा बंगल्यावर शांतता पसरली होती. एकनाथ शिंदे दुपारी 3 वाजेपर्यंत नाराजच होते. ते उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार नव्हते आणि त्यांना हवी असलेली गृह आणि नगरविकास खाते देण्यास भाजपा तयार नव्हती. या परिस्थितीतच शिवसेनेकडून प्रसिद्ध झालेले आमंत्रणपत्र सोशल मीडियावर फिरू लागले. या आमंत्रण पत्रावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव होते. मात्र उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव नव्हते. यामुळे एकनाथ शिंदे हे सत्तेत सामील होणार की नाही याची चर्चा अधिकच तणावात सुरू झाली. शिंदे गटाचा कुणीही नेते याबाबत नेमके काही सांगू शकत नव्हते. उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना एवढेच सांगितले की, एका तासाभरात एकनाथ शिंदे त्यांचा निर्णय जाहीर करतील. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे अशी आम्ही त्यांना वारंवार विनंती केली आहे. ते जर सरकारमध्ये सामील झाले नाहीत तर आम्हीही सामील होणार नाही हा आमचा निर्णय आहे. उदय सामंत यांच्या या पत्रकार परिषदेमुळे तणाव अधिकच वाढला आहे. यानंतर काही वेळाने उदय सामंत, भरत गोगावले आदी मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. तिथे अंतिम बोलणी झाली आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार झाले. यानंतर शिंदे गटाचे नेते सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांना भेटले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचे शिफारस पत्र घेऊन हे सर्वजण घाईने राजभवनात गेले आणि त्यांनी प्रधान सचिव प्रवीण दराडे यांना शिफारसपत्र सादर केले. या सर्व घडामोडी होईपर्यंत एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावरच बसून होते. यावेळी भाजपा नेते गिरीष महाजन यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. या भेटीनंतर ते म्हणाले की, एकनाथ शिंदे नाराज नाही. आमच्यात सगळे आलबेल आहे. मी कोणताही संदेश घेऊन आलो नव्हतो. मी फक्त त्यांना भेटायला आलो आहे. राज्यपालांकडे शिफारसपत्र गेल्यावर तणाव काहीसा निवळला आणि शपथविधीची पुढील प्रक्रिया सुरू झाली. आजचा शपथविधी झाल्यानंतर पुढील काही दिवस खातेवाटपाबाबत चर्चेचे गुर्हाळ सुरूच राहणार आहे. इतके मात्र खरे की, घवघवीत यश मिळाल्यानंतर या तीनही पक्षांत सत्तावाटपाबाबत एकमत न झाल्याने कटुता निर्माण झाली आहे. याचा परिणाम आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे.
मान्यवरांची उपस्थिती
शपथविधी सोहळ्याला अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राजनाथ सिंह, चिराग पासवान, विजय रुपाणी, आसाम – हेमंत बिस्वा सर्मा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उप्र.- योगी आदित्यनाथ, राजस्थान-भजनलाल शर्मा, आंध्र – चंद्राबाबू नायडू, म.प्र.- मोहन यादव, अरुणाचल प्रदेश – पेमा खंडू, ज्योतिरादित्य शिंदे, शिवराज सिंह, शरद पवार गटाचे माढाचे आमदार अभिजीत पाटील, कुमार मंगलम बिर्ला, मुकेश अंबानी, अनंत अंबानी, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडूलकर, विद्या बालन, रणबीर कपूर, सलमान खान, संजय दत्त, शाहरूख खान, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, खुशी कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, श्रद्धा कपूर, वरुण धवन, सुबोध भावे, शिखर पहारिया हे सिनेकलाकार उपस्थित होते.
फडणवीसांचे फोन करून
शरद पवार, राज ठाकरेंना निमंत्रण
शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना स्वतः फोन करून निमंत्रण दिले होते. मात्र राज ठाकरे यांच्या कौटुंबिक भेटीगाठी ठरलेल्या असल्यामुळे ते शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत. तर हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार दिल्लीत असल्यामुळे तेही शपथविधीला उपस्थित नव्हते. मात्र शरद पवार यांनी फोन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. राज्य शिष्टाचारानुसार माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आजच्या शपथविधीचा निमंत्रण दिले होते मात्र, ते मुंबईमध्ये असूनही शपथविधीला अनुपस्थित राहिले. त्याच बरोबर ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत, आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही निमंत्रण असले तरी तेही शपथविधीला
उपस्थित नव्हते.
सर्वच भगवे
आझाद मैदानावर शपथविधीसाठी उभारलेला तंबू हा भगव्या रंगाचा होता. मंचावर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान या तिघांचीच छायाचित्रे असलेला बॅनर लावला होता. प्रेक्षकांसाठी मांडलेल्या खुर्च्याही भगव्या रंगाच्या होत्या. लाडक्या भावांचा सन्मान पाहण्यासाठी आलेल्या लाडक्या बहिणी भगव्या साड्या नेसून आल्या होत्या. आजच शपथविधीसाठी मुंबईच्या अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सकाळपासून रस्त्यांची जोरदार सफाई करून रस्त्याच्या दुतर्फा कापड लावले होते. वरळी सी-लिंकवर गर्दी होऊ नये म्हणून टोल न घेता गाड्या सोडल्या जात होत्या.
महाराष्ट्र आता थांबणार नाही
शपथविधीच्या स्टेजवर बॅनर
मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी केली होती. तर शपथविधीच्या स्टेजवर ’आता महाराष्ट्र थांबणार नाही’ असे बॅनर लागले होते. आझाद मैदानाच्या समोरच्या रस्त्यांवर दोन्ही बाजूला तिन्ही पक्षांचे झेंडे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी बॅनर लावले होते. त्याचबरोबर भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदी म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर मैदानाच्या बाहेर लावले होते.
लाडकी बहीण योजना चालू राहील
बजेटमध्ये 2,100 चा विचार करू
– फडणवीसांची पहिली पत्रकार परिषद
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तिसर्यांदा शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज मंत्रालयात गेले. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत पुण्यातील एका रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारासाठी 5 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच ठेवणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना 2,100 रुपयेही देणार आहोत. बजेटच्या वेळी त्याचा विचार केला जाईल. शेवटी आर्थिक स्त्रोतांची योग्यप्रकारे पडताळणी करूनच ते करता येईल. पण निकषाच्या बाहेर कोणी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा पुनर्विचार केला जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीने दिलेल्या वचननाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत. राज्यातील सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार आहेत. राज्य चालवताना काही अडचणी येतात त्या सर्व अडचणींवर मात करून मार्गक्रमण करू. राज्यातील जनतेने दिलेल्या मतांचा कौल लक्षात घेऊन जनतेला हे पारदर्शी व गतिशिलपणे चालवणार आहोत. महायुती म्हणून समन्वयाने काम करणार आहोत. मी बदल्याचे राजकारण करणार नसून बदलाचे राजकारण करणार आहे. विरोधकांच्या संख्येवर आम्ही त्यांचा आवाज मोजणार नाही, त्यांनी उपस्थित केलेल्या योग्य प्रश्नांचा आम्ही सन्मान करू. विरोधी पक्षनेतेपद देण्याचा निर्णय हा पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचा असेल. याबाबतीत ते जे म्हणतील ते आम्हाला मान्य असेल. येत्या 7, 8 आणि 9 डिसेंबरला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. याच अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड करू. 9 तारखेला राज्यपालांना अध्यक्षांच्या निवडीसाठी पत्र देऊ. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चादेखील पूर्ण झाली आहे. कुणाला कुठले मंत्रालय हे अंतिम टप्प्यात आहे. नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. जुने मंत्री आहेत, त्यांच्या कामाचे मुल्यांकन केले जाईल. मी, शिंदे आणि अजित पवार एकत्र बसून निर्णय घेऊ. प्रादेशिक समतोल वगैरे गोष्टी बघून निर्णय घ्यावे लागतात. एकनाथ शिंदे नाराज होते, हे खरे नाही. मी स्वतः त्यांना भेटलो होतो आणि उपमुख्यमंत्रिपद घ्या, अशी विनंती केली होती. ती त्यांनी मान्य केली. त्यांच्या नाराजीच्या बातम्याच जास्त पसरवण्यात आल्या, असेही फडणवीस म्हणाले.