पालघर – गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील वातावरणात चढ-उतार आणि ढगाळ हवामान दिसत आहेत.या हवामान बदलामुळे तयार होत आलेल्या आंब्याचे नुकसान होत असल्यामुळे बागातदार संकटात सापडला आहे. त्यामुळे आता या आंब्यांच्या संरक्षणासाठी शेतकरी फळबागेत आंबा फळांना कागदी पिशव्यांचा आधार देत आहेत.
डहाणू तालुक्यातील बोर्डी,घोलवड,बोरीगाव परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आंब्याच्या संरक्षणासाठी कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. यामुळे जास्त उष्णता, वादळ, वारा, अवकाळी पाऊस इत्यादीमुळे होणारी फळाची गळती कमी होते, फळाचा आकार आणि वजन वाढते. डागविरहित फळे मिळतात.कागदी पिशव्यांमुळे आंब्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते आणि ते लवकर पिकण्यास मदत करतात. कागदी पिशव्या ह्या अतिशय स्वस्त दरात प्रति पिशवी एक रुपया या दराने बाजारात उपलब्ध आहेत.फळ गोटी ते अंडाकृती आकाराचे असताना २५ x २० सेमी आकाराची कागदी पिशवी वापरणे गरजेचे असते. पिशवी लावताना फळाच्या देठाला इजा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कागदी पिशव्या दवबिंदू ,पक्षी, फळगळ, ऊन,वारा यांपासून संरक्षण करत करतात.