उत्तर प्रदेशमध्ये साबरमती एक्स्प्रेस रुळावरून घसरली ! जिवितहानी नाही

लखनौ – वाराणसीहून साबरमतीकडे चाललेल्या साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे आज सकाळी उत्तर प्रदेशच्या कानपूरनजिक रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही. अपघात घडल्यानंतर तातडीने सर्व प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्यात आले. हा अपघात घडवून आणला असा संशय असल्याने त्या दृष्टीने चौकशी सुरू झाली आहे .कानपूर रेल्वेस्थानकापासून ११ किलोमीटर अंतरावर भीमसेन आणि गोविंदपुरी स्थानकांदरम्यान भल्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. रुळावर ठेवलेल्या जड वस्तूला धडकल्याने २२ डबे रेल्वे रुळावरून घसरल्याचे प्राथमिक तपासातून आढळून आले आहे.एका दगडासारख्या जड वस्तूला धडक दिल्याने अपघात झाला,असे गाडीच्या चालकाने सांगितले.झाशीचे विभागीय व्यवस्थापक दीपक सिंह यांनी सांगितले की, अपघात घडला तेव्हा बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. मोठा आवाज झाल्याने प्रवासी दचकून उठले. अपघात झाल्याचे कळताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अपघातानंतर ५० किलोमीटरपर्यंतचे रुळ उखडले गेले आहेत. त्यामुळे कानपूरहून बुंदेलखंड आणि मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या . कानपूरहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्वाचा मानला जातो. अपघातामुळे या मार्गावरील अनेक गाड्यांचा खोळंबा झाला.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स पोस्ट करून या अपघाताची माहिती दिली.रुळावर ठेवण्यात आलेल्या जड वस्तुमुळे हा अपघात झाल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे याचा सखोल तपास करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेला देण्यात आले आहेत,असे वैष्णव यांनी सांगितले.