नाशिक – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला सहा नवीन शिवाई इलेक्ट्रिक बस मिळाल्या असून, या बस प्रथमच नवीन मार्गांवर सुरू करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि सटाणा मार्गांवर शिवाई बसची सेवा सुरू करण्यात आली आहे.
नाशिक-पुणे आणि नाशिक-बोरीवली मार्गावर आधीपासूनच शिवाई बस सुरू आहेत.आता नाशिक-छत्रपती संभाजीनगर मार्गावरदेखील शिवाई बस सुरू करण्यात आल्या आहेत. शिवशाही वातानुकूलित बसच्या तुलनेत या बसच्या प्रवासाचे दर थोडेसे अधिक आहेत. शिवाई बसमधून छत्रपती संभाजीनगरपर्यंत जाण्यासाठी ४७० रुपये भाडे आकारले जाईल तर शिवशाही बसमध्ये प्रत्येक प्रवाशाला ४४० रुपये शुल्क आकारले जाईल. नाशिक-सटाणापर्यंतच्या एका बाजूच्या प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाला २१० रुपये मोजावे लागतील. तसेच नाशिक-छत्रपती संभाजीनगर मार्गावर आधी चालवल्या जाणाऱ्या दोन बसदेखील आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवाशांना दिवसभरात प्रत्येकी चार बसचा लाभ मिळणार आहे.
यापूर्वी नाशिक आणि सटाणा मार्गावरही शिवाई बस सेवा सुरू करण्यात आली आहे.मात्र, रस्ता चांगला नसल्याने पूर्वी चालणाऱ्या इलेक्ट्रिक बसची सेवा थांबविण्यात आली होती. मात्र, आता रस्ता चांगला झाल्याने ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे.