अयोध्येत रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी

अयोध्या – श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत राम मंदिर ट्रस्टने आणि जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. रामनवमीच्या दिवशी म्हणजे उद्या अयोध्येत ५० लाखांहून अधिक भाविक दाखल होतील, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे भाविकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व स्तरावर व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार पहिल्यांदाच रामनवमीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मेळा परिसर झोन आणि सेक्टरमध्ये विभागण्यात आला आहे. सुरक्षाव्यवस्था व्यापक करण्यात आली आहे. राममंदिरातील रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरातून बाहेर पडताना प्रसाद दिला जाणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा दंडाधिकारी चंद्र विजय सिंह म्हणाले की, जागतिक स्तरावर अयोध्येचा सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करावा, हे आमचे उद्दिष्ट आहे. अयोध्येतील रामनवमीचा हा उत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही, तर अयोध्येच्या सांस्कृतिक आणि पर्यटन क्षमतेचे दर्शन घडवणारा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. तापमानवाढीमुळे आम्ही भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. राम पथ आणि जन्मभूमी पथावर २०० पाण्याचे स्टँड भरण्यात आले आहे. या मार्गांवर थंडावा मिळावा म्हणून कूलरही बसवण्यात आले आहेत.