अमेरिकेच्या उपाध्यक्षांचे पहिल्या भारत दौऱ्यात अक्षरधाम दर्शन

नवी दिल्ली – अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स कुटुंबासह चार दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी दौऱ्याच्या पहिल्याच दिवसाच्या सुरवातीला दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात दर्शन घेतले. उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे. या दौऱ्यात त्यांच्यासह त्यांच्या पत्नी उषा आणि मुले इवान, विवेक आणि मिराबेल आहेत. सकाळी १० वाजताच्या सुमारास ते पालम विमानतळावर उतरले. याठिकाणी त्यांचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वागत केले. विमानतळावर त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. कलाकारांनी वेन्स, त्यांची पत्नी आणि मुलांसमोर पारंपरिक नृत्य सादर केले. त्यानंतर त्यांनी अक्षरधाम मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिर व्यवस्थापनाने सर्वांना हार घालले. संपूर्ण कुटुंबाने मंदिरात फोटो काढले. जेडी वेन्स यांनी मुलांसह मंदिरात प्रवेश केला.त्यानंतर जेडी वेन्स कुटुंबाने जनपथ येथील सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज एम्पोरियमला भेट दिली. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी वेन्स आणि त्यांच्या कुटुंबासाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते. या दौऱ्यात वेन्स परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएसए अजित डोभाल, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांचीही भेट घेणार आहेत.
अमेरिकेच्या दुसऱ्या महिला उषा वेन्स या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचे पालक आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी आणि कृष्णा जिल्ह्यातील होते, नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. तेथेच उषा यांचा जन्म झाला. जन्मानंतर त्या पहिल्यांदाच भारतात आल्या आहेत.