बारामती- बारामतीतील सुपा येथे झालेल्या बूथ कमिटीच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार नसल्याचे संकेत दिले. मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे बारामतीतून जय पवार यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली.
अजित पवार म्हणाले की, कुणी मंडळांना पैसे वाटले, ते हक्काने घ्या. मात्र बटण दाबायचे तेच दाबा. तुमची आम्हाला साथ पाहिजे. राज्यात छातीठोकपणे सांगायचे की १ लाख ६८ हजार मतांनी निवडून आलो आहे. राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यात माझी गणती होती. हे सर्व तुमच्यामुळे घडले आहे. जेवढे तुम्ही मतदान केले तेवढा जास्त निधी मी बारामतीत आणला. राज्यात सर्वात जास्त निधी बारामतीतच आणला आहे. मी उमेदवार देईन त्यालाच तुम्ही निवडून आणा.