Zomato Layoffs | ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने आपल्या ग्राहक सहाय्यक टीममधील 600 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांची भरती अवघ्या एका वर्षापूर्वी झाली होती. खर्च कपात आणि ऑटोमेशनवर अधिक भर देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
Zomato च्या अन्न वितरण व्यवसायाच्या वाढीचा वेग मंदावल्याने आणि Blinkit या क्विक कॉमर्स शाखेमध्ये होत असलेल्या तोट्यामुळे कंपनीला मोठे आर्थिक आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे कंपनीने ग्राहक सहाय्य सेवा स्वयंचलित करण्यासाठी AI चा अधिक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने अलीकडेच Nugget नावाचे AI-आधारित ग्राहक सहाय्यक प्लॅटफॉर्म सुरू केले असून, हे सध्या Zomato, Blinkit आणि Hyperpure साठी महिन्याला लाखो ग्राहकांशी संवाद साधण्यास सक्षम आहे.
Zomato ॲसोसिएट ॲक्सिलरेटर प्रोग्राम (ZAAP) अंतर्गत कंपनीने 1,500 ग्राहक सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती केली होती. त्यांना विक्री, कामकाज आणि पुरवठा साखळी यांसारख्या विविध विभागांमध्ये बढती देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांचे करार नूतनीकरण न करता त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांना कंपनीने एक महिन्याचे वेतन नुकसानभरपोटी दिले असले, तरी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. Zomato ने AI चा वापर वाढवला असल्यामुळे कर्मचाऱ्यांची गरज कमी भासू लागली आहे.
दरम्यान, कंपनीच्या आर्थिक कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, FY25 च्या तिसऱ्या तिमाहीत Zomato च्या करानंतरच्या नफ्यात 57% घट झाली, तर महसूलात 64% वाढ होऊन तो 5,404 कोटी रुपये झाला. याशिवाय, गेल्या वर्षभरात सह-संस्थापक आणि मुख्य पीपल ऑफिसर आकृती चोप्रा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनी सोडल्याने Zomato मधील व्यवस्थापन पातळीवरही मोठे बदल झाले आहेत.