World Sparrow Day 2025: जागतिक चिमणी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व 

World Sparrow Day 2025 | दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा केला जात आहे. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा झाल्या आहेत. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या झपाट्याने घटत असून, त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शहरीकरण, वाढते प्रदूषण आणि जंगलतोड यांसारख्या कारणांमुळे चिमण्यांचा वावर आता दुर्मिळ होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.  

जागतिक चिमणी दिनाचे महत्त्व

चिमण्या केवळ आकर्षक पक्षी नसून, पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात तसेच बीज प्रसारात योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी चिमण्यांचे अस्तित्व आवश्यक आहे. मात्र, शहरीकरणामुळे त्यांचे पारंपरिक अधिवास नष्ट होत आहेत. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्याने चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे.  

जागतिक चिमणी दीन 2025 ची थीम (World Sparrow Day 2025 Theme)

जागतिक चिमणी दिन 2025 ची थीम A Tribute to Nature’s Tiny Messengers आहे. ही थीम चिमण्यांचे निसर्गातील योगदान अधोरेखित करते आणि त्यांच्या संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करते. या थीमद्वारे लोकांना चिमण्यांशी पुन्हा जोडले जाण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी छोटी पण प्रभावी पावले उचलण्यास प्रोत्साहित केले जाईल.

जागतिक चिमणी दिनाची सुरुवात कधी आणि कशी झाली?  (History of World Sparrow Day)

चिमण्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने 2010 मध्ये जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरणतज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इको-सिस अॅक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 मध्ये त्यांना “हिरोज ऑफ द एन्व्हायर्नमेंट” म्हणून गौरवले होते.  

चिमण्यांच्या संवर्धनासाठी काय करता येईल?  

  • आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर चिमण्यांसाठी घरटे बसवावे.
  • त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय करावी.
  • शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती मोहीम राबवावी.
  •  कीटकनाशकांचा वापर कमी करावा, कारण ते चिमण्यांच्या खाद्यस्रोतावर परिणाम करतात.
  • स्थानिक पक्षीसंवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करावे.

जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा नाही, तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचा संदेश देणारा दिवस आहे. नागरिकांनी थोडासा प्रयत्न केल्यास चिमण्यांचा गोड किलबिलाट पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचे संतुलनही टिकून राहील.