जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत भारतीय रोशनी नादर (Roshni Nadar) यांना स्थान मिळाले आहे. नुकतेच, हुरुन ग्लोबलने (Hurun Global Rich List) जगातील सर्वात श्रीमंत महिलांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये रोशनी नादर या 5व्या क्रमांकावर आहेत. एवढेच नाही तर पहिल्या 10 श्रीमंत महिलांच्या यादीत त्या एकमेव भारतीय आहेत.
काही दिवसांपूर्वीच एचसीएल ग्रुपचे संस्थापक शिव नादर यांनी आपल्या 47% भागभांडवलाची मालकी मुलगी रोशनी नादर मल्होत्रा यांना हस्तांतरित केली. हे हस्तांतरण गिफ्ट डीडच्या माध्यमातून करण्यात आले, ज्यामुळे त्या एचसीएल टेक्नोलॉजीज आणि एचसीएल इन्फोसिस्टम्सच्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डर झाल्या.
कोण आहेत रोशनी नादर? (Who is Roshni Nadar)
रोशनी नादर मल्होत्रा जुलै 2020 मध्ये एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्या. त्या एचसीएल टेक्नोलॉजीजच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) बोर्ड कमिटीच्या प्रमुख देखील आहेत.
नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, त्यांनी केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून MBA पूर्ण केले. 2023 मध्ये त्यांना परोपकारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रतिष्ठित शॅफ्नर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या शिव नादर फाउंडेशनच्या कार्यात सक्रिय आहेत.
रोशनी नादर मल्होत्रा द नेचर कन्झर्व्हन्सीच्या जागतिक मंडळाच्या सदस्य आहेत आणि MIT स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या डीनच्या सल्लागार परिषदेत देखील आहे. 2017 पासून त्यांचा समावेश Forbes’ Top 100 Most Powerful Women यादीत सातत्याने होत आहे. 2024 मध्ये त्यांना फ्रान्सच्या Chevalier de la Légion d’Honneur पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
रोशनी नादर यांची संपत्ती किती?
रोशनी नादर या हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 मध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, त्या जगातील पाचव्या सर्वाधिक श्रीमंत महिला बनल्या आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत टॉप-5 महिला
जगातील टॉप 5 सर्वाधिक श्रीमंत महिलांमध्ये अॅलिस वॉल्टन (वॉलमार्ट), फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर्स (लॉरियल), जुलिया कोच (कोच इंडस्ट्रीज), जॅकलीन मार्स (मार्स) आणि रोशनी नादर (एचसीएल टेक्नोलॉजीज) यांचा समावेश आहे.