रॅपर ‘हनुमानकाइंड’ कोण आहे? ज्याचे पीएम मोदींनी ‘मन की बात’मध्ये केले कौतुक

Hanumankind Appreciated by PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या मासिक कार्यक्रमाच्या 120 व्या भागात स्थानिक खेळ आणि संगीताच्या वाढत्या लोकप्रियतेवर प्रकाश टाकला. या चर्चेदरम्यान, त्यांनी प्रसिद्ध रॅपर ‘हनुमानकाइंड’च्या (Rapper Hanumankind) कार्याचे विशेष कौतुक केले. ‘हनुमानकाइंड’च्या ‘रन इट अप’ या गाण्याचा देखील त्यांनी उल्लेख केला.

‘हनुमानकाइंड’ कोण आहे (Who is Hanumankind) आणि तो चर्चेत का आहे?

‘हनुमानकाइंड’ हा केरळमधील रॅपर, गायक आणि अभिनेता असून त्याचे खरे नाव सूरज चेरुकाट आहे. 2019 मध्ये ‘डेली डोस’ या पहिल्या सिंगलसह त्याने आपल्या संगीत प्रवासाला सुरुवात केली. भारतातील ‘NH7 वीकेंडर’ सारख्या मोठ्या कार्यक्रमांमधील परफॉर्मन्समुळे तो चर्चेत आला. त्याचे स्टेज नेम ‘हनुमानकाइंड’ हे ‘हनुमान’ आणि ‘मॅनकाइंड’ या शब्दांच्या संयोगातून तयार झाले आहे.

1992 मध्ये केरळच्या मल्लापुरम येथे जन्मलेला सूरज अनेक देशात राहिला आहे. वडिलांच्या नोकरीमुळे त्याने नायजेरिया, इजिप्त, दुबई आणि अमेरिकेत आपले बालपण घालवले. अमेरिकेत शिक्षण घेतल्यानंतर 2012 मध्ये तो भारतात परतला आणि कोईम्बतूरच्या पीएसजी कॉलेजमध्ये व्यवसाय प्रशासनाचा अभ्यास केला. काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केल्यानंतर 2019 मध्ये त्याने व्यावसायिक रॅपर म्हणून कारकीर्द सुरू केली. आपल्या अनोख्या शैलीमुळे आणि संगीत योगदानामुळे त्याने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

‘रन इट अप’ या गाण्याबद्दल मोदींनी काय सांगितले?

‘हनुमानकाइंड’च्या ‘रन इट अप’ (Run It Up) या नवीन गाण्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये केला. हे गाणे भारतातील पारंपरिक मार्शल आर्ट्सचे दर्शन घडवते. पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपले स्थानिक खेळ आता लोकप्रिय संस्कृतीचा भाग बनत आहेत. ‘रन इट अप’ या गाण्यात कलारीपयट्टू, गटका आणि थांग-टा यांसारख्या परंपरागत मार्शल आर्ट्सचा समावेश आहे.”

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘हनुमानकाइंड’ने न्यूयॉर्कमधील युनियनडेल येथे पंतप्रधान मोदींच्या एका रॅलीतही परफॉर्मन्स दिला होता.

‘मन की बात’ मधील अन्य महत्त्वाचे मुद्दे

  • नवीन वर्ष उत्सव: मोदींनी रविवारी अनेक राज्यांमध्ये पारंपरिक नवीन वर्ष साजरे होत असल्याचा उल्लेख केला.
  • विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा: शालेय उन्हाळी सुट्ट्यांचा उपयोग नवीन कौशल्ये शिकण्यासाठी करण्याचे आवाहन केले. त्यांनी ‘माय हॉलिडे’ आणि ‘हॉलिडे मेमरीज’ हॅशटॅग वापरून अनुभव शेअर करण्यास सुचवले.
  • जलसंधारण मोहिम: ‘कॅच द रेन’ उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत गेल्या सात-आठ वर्षांत 11 अब्ज घनमीटरहून अधिक पाणी वाचवण्यात आल्याची माहिती दिली.
  • योगाचे महत्त्व: 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर, ‘एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग’ ही यंदाची थीम असल्याचे सांगितले.