WhatsApp वर फोटो शेअर करणे होणार अधिक मजेशीर, लवकरच येणार ‘हे’ खास फीचर, 

WhatsApp Android Beta Motion Photos | इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp यूजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असते. WhatsApp लवकरच यूजर्ससाठी आणखी एक नवीन फीचर आणणार आहे. कंपनीने बीटा व्हर्जनसाठी नवीन मोशन फोटो फीचर जारी केले आहे.

सध्या बीटा व्हर्जनसाठी मोशल फोटो फीचर जारी करण्यात आले आहे. लवकरच सर्वच यूजर्ससाठी हे खास फीचर उपलब्ध होईल. याद्वारे यूजर्सला WhatsApp चॅट, ग्रुप आणि चॅनेलमध्ये मोशन फोटो शेअर करता येईल. या फीचरच्या मदतीने यूजर्स स्मार्टफोनच्या माध्यमातून काढलेले हलणारे फोटो इतर यूजर्सला शेअर करू शकतील.

यूजर्सला रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ आणि व्हिडिओसह एक लहान क्लिप शेअर करण्याची सुविधा मिळेल. हे फीचर Android स्मार्टफोनसाठी नवीन बीटा व्हर्जनसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. तर आयफोन यूजर्स लाइव्ह फोटो स्वरुपात या फीचरचा वापर करू शकतील.

WABetaInfo नुसार, WhatsApp पर्सनल चॅट, ग्रुप चॅट आणि चॅनेल्सवर मोशन पिक्चर्स शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी काम करत आहे. सर्वातआधी हे फीचर Android 2.25.8.12 व्हर्जनवर पाहायला मिळाले होते. 

सध्या स्थिर फोटो शेअर केले जातात, परंतु व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटमध्ये यूजर्सला चॅट किंवा चॅनेलवर मोशन पिक्चर्स (किंवा आयओएसवर लाइव्ह फोटो) शेअर करता येईल. मोशन फोटो कॅप्चर करण्याची सुविधा काही ठराविक स्मार्टफोन्सवरच उपलब्ध आहे. असे असले तरीही WhatsApp इतर डिव्हाइससाठी देखील हे फीचर पाहण्याची सुविधा उपलब्ध करेल. या नवीन फीचरमुळे WhatsApp वर फोटो शेअर करणे अधिक मजेशीर होईल.