व्हॉट्सअ‍ॅपने 99 लाख भारतीयांचे अकाउंट्स केले बंद, ‘हे’ आहे कारण

WhatsApp Banned Indian User | इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) जवळपास 99 लाख भारतीयांचे अकाउंट्स बंद केले आहेत. केवळ 1 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 या 1 महिन्यांच्या कालावधीत कंपनीकडून कारवाई करण्यात आली आहे. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 च्या नियम 4(1)(d) आणि 3A(7) नुसार व्हॉट्सअ‍ॅपकडून दरमहिन्याला रिपोर्ट जारी केला जातो. या रिपोर्टमध्ये कारवाईबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच, प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) रिपोर्टमध्ये माहिती दिली की, जानेवारी 2025 मध्ये एकूण 9,967,000 भारतीय अकाउंट्स बंद करण्यात आले. यापैकी 1,327,000 अकाउंट्स तक्रारीआधीच बंद करण्यात आले. 

याच महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपला यूजर्सकडून 9,474 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 239 तक्रारींच्या आधारावर अकाउंट्स बंद करणे व इतर उपाययोजना केल्या गेल्या. यामध्ये भारतातील तक्रार अधिकाऱ्यांना ईमेल आणि टपालाद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या कारणांमुळे अकाउंट्स केले बंद

व्हॉट्सअ‍ॅपकडून अटींचे उल्लंघन केल्यास अकाउंट बंद केले जाते. यामध्ये बल्क मेसेजिंग, स्पॅम, फसवणूक करणे किंवा दिशाभूल करणारी माहिती शेअर करणे यांचा समावेश असतो. तसेच, भारतीय कायद्यांनुसार अवैध मानल्या जाणाऱ्या कोणत्याही कृतीत सामील असलेल्या खात्यांवर व्हॉट्सअ‍ॅप बंदी घालते. याशिवाय, यूजर्सकडून येणाऱ्या तक्रारीदेखील महत्त्वाच्या असतात. जर एखाद्या अकाउंटविरुद्ध गैरवर्तन, छळ किंवा अयोग्य वर्तनाच्या तक्रारी प्राप्त झाल्या, तर अशा अकाउंटवरही कारवाई केली जाते.