WhatsApp वर मेसेज करणे होणार अधिक मजेशीर, कंपनीने लाँच केले ‘हे’ खास फीचर

WhatsApp हे सर्वात लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. कंपनीकडून यूजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर जारी केले जातात. WhatsApp ने आता एक नवीन फीचर Chat Themes सादर केले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्सला मेसेज करताना खास अनुभव मिळणार आहे.

या फीचरद्वारे यूजर्सला त्यांच्या चॅट वॉलपेपरला स्वतःच्या आवडीनुसार कस्टमाइझ करता येणार आहे. या मेसेजची माहिती देताना कंपनीने सांगितले की, आम्ही चॅट थीम्स सादर करत आहोत, याद्वारे तुम्ही रंगीबेरंगी चॅट बबल्स आणि नवीन वॉलपेपरसह तुमच्या चॅटला खास बनवू शकता.

WhatsApp ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (Twitter) वर या फीचरबाबत माहिती दिली आहे. या नवीन फीचरमुळे यूजर्सला चॅटच्या लूकवर अधिक नियंत्रण मिळेल. तसेच, स्वतःच्या इच्छेनुसार चॅटचा रंग बदलता येईल.

WhatsApp ने यूजर्सला खास विविध प्री-सेट थीम्स देखील दिल्या आहेत. याशिवाय, यूजर्सला स्वतःची वेगळी थीम तयार करण्याची सुविधाही मिळणार आहे. यूजर्स वेगवेगळे रंग मिसळून आपली खास थीम तयार करू शकतात.  थीम्स व्यतिरिक्त, WhatsApp ने 30 नवीन वॉलपेपर पर्याय देखील सादर केले आहेत.

WhatsApp चॅट थीम कशी बदलायची?

  • यासाठी WhatsApp उघडा आणि वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्स असलेल्या मेन्यूवर क्लिक करा. 
  • त्यानंतर Settings पर्याय निवडा आणि नंतर Chats वर जा. 
  • येथे Default chat theme वर क्लिक करा. येथे तुम्ही थीम, चॅटचा रंग आणि वॉलपेपर बदलू शकता.