VS ने सादर केली जगातील पहिली सीएनजी स्कूटर, फीचर्स-स्पेसिफिकेशन्स खूपच जबरदस्त

TVS Jupiter CNG Scooter: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची लोकप्रियता वाढली आहे. केवळ कारच नाही तर दुचाकी सेगमेंटमध्ये देखील इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली जात आहे. त्यातच आता प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनीने सीएनजीवर धावणारी स्कूटर सादर केली आहे. कंपनीने  2025 भारत मोबिलिटी ऑटो एक्सपोमध्ये (Bharat Mobility Global Expo 2025) सीएनजीवर आधारित स्कूटर सादर केली आहे.

कंपनीने त्यांची लोकप्रिय स्कूटर Jupiter चे सीएनजी मॉडेल सादर केले आहे. सादर करण्यात आलेली ज्युपिटर 125 CNG (TVS Jupiter) स्कूटर मागील जनरेशन मॉडेलवर आधारित आहे. या स्कूटरचा लूक आणि डिझाईन आधीच्या ज्युपिटरप्रमाणेच आहे. मात्र, याच्या मेकॅनिझम आणि पॉवरट्रेनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

Jupiter 125 CNG पॉवर आणि रेंज

इंजिनबद्दल सांगायचे तर या CNG मॉडेलमध्ये 124.8cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 6,000 RPM वर 7.1 BHPची पॉवर आणि 5,500 RPM वर 9.4 Nmचा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनला कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन (CVT) ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

कंपनीने गाडीच्या सीटच्या खाली 1.4 किलोग्रॅमची CNG टाकी दिली आहे. तसेच, 2 लीटर पेट्रोल टँक देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की  स्कूटर 1 किलोग्रॅम CNG वर 84 किमी रेंज देऊ शकते. तर पेट्रोल+सीएनजी 226 किमी रेंजम मिळेल. या स्कूटरचा कमाल वेग ताशी 80.5 किमी आहे.

इतर फीचर्सबद्दल सांगायचे तर यात LED हेडलाइट, मोबाइल चार्जिंग पोर्ट, ऑल-इन-वन लॉक आणि साइड स्टँड इंडिकेटर देण्यात आले आहे. यामध्ये अनेक की रीडआउट्ससह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील मिळेल. तसेच, स्कूटर मेटल-मॅक्स बॉडीसह येते. दरम्यान, कंपनीने या सीएनजी स्कूटरला आता केवळ एक्स्पोमध्ये सादर केले आहे. ही स्कूटर बाचारात कधी लाँच होईल व ग्राहक कधी खरेदी करू शकतील, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.