UPI Down in India | देशभरात यूपीआय (UPI Down) सेवा अचानक ठप्प झाली होती. यामुळे आर्थिक व्यवहार करताना अनेकांना समस्या आल्याचे पाहायला मिळाले. सध्या यूपीआयच्या (UPI Payment) माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पेमेंट करताना अचानक समस्या आल्याने अनेकांना अडचण निर्माण झाली.
गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pay), पेटीएमसह (PayTM) इतर यूपीआय अॅप्सच्या माध्यमातून पेमेंट करताना ग्राहकांना समस्या आली. याचा सर्वाधिक फटका गुगल पे यूजर्सला बसला. अनेक यूजर्सने सोशल मीडियावर ही सेवा वापरण्यास समस्या येत असल्याची तक्रार केली.
यूपीआय (Unified Payments Interface) अॅप्समधून पैसे पाठवत असताना नेटवर्क नसल्याचे सांगितले जात होते. तर दोन वेळा पैसे कापण्यात आल्याची तक्रार देखील अनेकांनी केली.
यूपीआय सेवा सुरळीत नसल्याने देशभरातील लाखो लोकांना याचा फटका बसला. मात्र, काही वेळेतच एनपीसीआयने सेवा सुरळीत झाली असल्याची माहिती दिली. तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा काही वेळेसाठी ठप्प झाली होती.
याबाबत एनपीसीआयने (NPCI) माहिती दिली की,एनपीसीआयला काही तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागल्याने यूपीआय सेवा काहीवेळेसाठी ठप्प झाली होती. ही समस्या सोडवण्यात आली असून, सिस्टम सुरळीत सुरू आहे.
दरम्यान, भारतात जवळपास 35 कोटी यूपीआय यूजर्स आहेत. गेल्याकाही वर्षात डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने यूपीआयच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या सेवेत समस्या आल्यास लाखो यूजर्सला याचा फटका बसत असल्याचे पाहायला मिळाले.