‘सौगात ए मोदी नाही हे तर सौगात ए सत्ता…’ उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

ईदच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीकडून ‘सौगात-ए-मोदी’ या कॅम्पेनच्या माध्यमातून देशभरातील 32 लाख मुस्लिम बांधवांना खास गिफ्ट दिले जाणार आहे. भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाकडून ‘सौगात-ए-मोदी’ कॅम्पेन राबवले जात आहे. मात्र, आता यावरून शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने झेंड्यावरचा हिरवा रंग कधी काढणार हे सांगावे किंवा हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजपकडून सुरू करण्यात आलेल्या ‘सौगात-ए-मोदी’ कॅम्पेनवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला मुस्लिम समाजाने मतदान केल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असे म्हणाले. आता यांनी सौगात ए मोदी हा कार्यक्रम हाती घेतला आहे.

भाजपने अधिकृतपणे जाहीर करावे की त्यांनी हिंदुत्व सोडले आहे. ज्यांची घरे बुलडोझरने पाडली गेली आणि जे सांप्रदायिक दंगलीत मृत्यूमुखी पडले, अशांना ते ‘सत्तेची सौगात’ वाटत आहेत. ही योजना केवळ बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आहे. भाजपने आता सत्तेच्या जिहादचा मार्ग स्वीकारला आहे., असे ते म्हणाले.

सत्तेसाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात याचे हे एक उदाहरण आहे. हे सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देणारे आता भेट देत आहेत. आयुष्यभर मुस्लीम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यावर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे., अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी सौगात-ए-मोदी कॅम्पेनवरून भाजपवर केली आहे.

‘सौगात-ए-मोदी’ कॅम्पेन काय आहे?

भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाकडून ‘सौगात-ए-मोदी’ कॅम्पेन राबवले जात आहे. या अंतर्गत देशभरातील 32 लाख मुस्लिम कुटुंबांना ईदच्या निमित्ताने किट भेट दिले जाईल. या किटमध्ये कपडे व इतर दैनंदिन उपयोगाच्या वस्तू असतील. मात्र, विरोधकांकडून बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून हे कॅम्पेन राबवले जात असल्याचा आरोप केला जात आहे.