ट्रम्प यांनी अमेरिकन निवडणूक प्रक्रियेत केला ‘हा’ मोठा बदल, भारताचे कौतुक करत घेतला महत्त्वाचा निर्णय

Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी देशातील निवडणुकीत बदल करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या नव्या आदेशानुसार आता अमेरिकेत निवडणुकीत (American elections) मतदान करण्यासाठी देशाचे नागरिकत्व अनिवार्य असेल. म्हणजेच, संघीय निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करताना नागरिकत्वाचा (proof of US citizenship) पुरावा सादर करावा लागणार आहे.

भारतात निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिकांकडे मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड हे पुरावा म्हणून असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे आता अमेरिकेतही निवडणुकीत मतदान करण्यासाठी ओखळपत्र अनिवार्य असणार आहे.

ट्रम्प यांच्या या आदेशामध्ये भारतीय निवडणूक व्यवस्थेचे कौतुक करण्यात आले आहे. ट्रंप यांनी कार्यकारी आदेशात म्हटले आहे की, अमेरिका स्वशासन असलेला मोठा देश असूनही, तो निवडणुकीत मूलभूत आणि आवश्यक सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरला आहे. उदाहरणार्थ, भारत आणि ब्राझील मतदार ओळख निश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक डेटाबेसचा वापर करत आहेत.

ट्रम्प यांनी यापूर्वी अमेरिकेतील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे म्हटले आहे. 2020 च्या निवडणुकीत डेमोक्रॅट जो बायडेन यांच्याकडून पराभव झाल्यापासून, ट्रम्प यांनी सातत्याने मतदान प्रक्रियेत बदल करण्याची मागणी केली आहे. 

नवीन आदेशानुसार, अमेरिकेतील मतदार नोंदणी फॉर्ममध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मतदारांना नागरिकत्वाचा पुरावा जसे की अमेरिकन पासपोर्ट किंवा जन्म प्रमाणपत्र फॉर्मसोबत जमा करावा लागेल. तसेच, राज्यांना आपल्या मतदार यादी आणि त्याच्या देखभालीसंबंधीचे रेकॉर्ड पुनरावलोकनासाठी होमलँड सिक्योरिटी विभाग आणि सरकारी कार्यक्षमता विभाग (DOGE) यांना सादर करावे लागतील.

याशिवाय, निवडणुकीच्या दिवसानंतर मिळणाऱ्या मेल-इन मतपत्रिका स्वीकारल्या जाणार नाहीतजर राज्यांनी या नव्या नियमांचे पालन केले नाही, तर त्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत कपात केली जाऊ शकते, असेही ट्रम्प यांनी आदेशात म्हटले आहे.