Toll Collections : 5 वर्षांत टोल संकलनात विक्रमी वाढ, 10 टोल नाक्यांवर 13,988 कोटींचा महसूल जमा

India’s total toll collections | गेल्या पाच वर्षांत देशातील प्रमुख महामार्गांवर मोठ्या प्रमाणात टोल वसूल (toll collections) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, देशातील 10 मोठ्या टोल (India’s top 10 toll plazas collections) नाक्यांवर एकूण 13,988 कोटी रुपयांहून अधिक टोल संकलन झाले आहे. हे संकलन 2019-20 ते 2023-24 या कालावधीत झाले असून, त्यामध्ये ग्रँड ट्रंक रोड, दिल्ली-मुंबई महामार्ग आणि पूर्व किनारपट्टी महामार्गावरील टोल नाक्यांचा मोठा वाटा आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील भरथाना टोल नाका सर्वाधिक महसूल जमा करणारा टोल नाका ठरला आहे. वडोदरा-भरूच (NH-48) मार्गावरील या टोल नाक्यावर पाच वर्षांत 2,043.81 कोटी रुपये संकलित झाले, त्यापैकी 2023-24 मध्येच 472.65 कोटी रुपये जमा झाले. राजस्थानमधील शहाजहानपूर टोल नाका (गुरगाव-कोटपुतली-जयपूर, NH-48) दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे पाच वर्षांत 1,884.46 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

तिसऱ्या स्थानावर पश्चिम बंगालमधील जलधुलागोरी टोल नाका (धनकुनी-खडगपूर, NH-16) आहे, तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे उत्तर प्रदेशातील बरजोर टोल नाका (इटावा-चक्‍केरी, NH-19) आणि हरियाणातील घरौंदा टोल नाका (पानिपत-जलंधर, NH-44) आहेत.

इतर महत्त्वाच्या टोल नाक्यांमध्ये चोरयासी टोल नाका (भरूच-सूरत, NH-48, गुजरात), थिकरिया/जयपूर टोल नाका (जयपूर-किशनगड, NH-48, राजस्थान), L&T कृष्णगिरी थोपूर टोल नाका (NH-44, तामिळनाडू), नवाबगंज टोल नाका (कानपूर-अयोध्या, NH-25, उत्तर प्रदेश) आणि सासाराम टोल नाका (वाराणसी-औरंगाबाद, NH-2, बिहार) यांचा समावेश आहे.

हे 10 टोल नाके एकूण देशातील टोल संकलनाच्या 7 टक्क्यांहून अधिक वाटा उचलतात. 2019-20 ते 2023-24 या कालावधीत देशभरात टोल संकलन 1.93 लाख कोटी रुपये झाले आहे. सध्या देशात एकूण 1,063 टोल नाके आहेत, त्यापैकी 457 टोल नाके मागील पाच वर्षांत उभारण्यात आले आहेत.