Startup Mahakumbh 2025 | केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘स्टार्टअप महाकुंभ 2025’च्या (Startup Mahakumbh 2025) दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन केले. 3 एप्रिलपासून सुरू झालेला हा कार्यक्रम 5 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या 3 दिवसीय स्टार्टअप फेस्टमध्ये देशविदेशातील उद्योजक, गुंतवणूकदार आणि स्टार्टअप प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
या ‘महाकुंभ’मध्ये 3,000 स्टार्टअप्स, 1,000 गुंतवणूकदार, 50 पेक्षा अधिक देशांचे 10,000 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि सुमारे 50,000 व्यावसायिक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन फिक्की, असोचॅम, आयव्हीसीए आणि बूटस्ट्रॅप ॲडव्हायझरी अँड फाउंडेशन यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
थीम – ‘जिले से जगत तक’ (Startup Mahakumbh theme)
या कार्यक्रमाची थीम ‘जिले से जगत तक’ म्हणजेच जिल्ह्यापासून जागतिक पातळीपर्यंत स्टार्टअप्सची घोडदौड साधणारी आहे. डीपीआयआयटीचे सहसचिव संजीव यांनी सांगितले की, भारतातील लहान शहरांमधील उद्योजकांना ग्लोबल नेटवर्कशी जोडण्याचा उद्देश यामागे आहे.
स्टार्टअप्ससाठी नवी संधी
यंदा प्रथमच 45 हून अधिक आदिवासी स्टार्टअप्सना आपले प्रकल्प सादर करण्याची संधी दिली जात आहे. यामध्ये आयआयएम कोलकाता, काशीपूर आणि आयआयटी भिलाईच्या मदतीने तयार झालेल्या स्टार्टअप्सचा (Startups) समावेश आहे. मेड-इन-इंडिया फ्लाइंग टॅक्सीचे प्रदर्शन, दक्षिण कोरियाच्या 11 स्टार्टअप्सचा मंडप आणि नेपाळकडून सादर होणारे शाश्वत रॉकेट या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरणार आहेत.
पास नोंदणी आणि शुल्क (Startup Mahakumbh 2025 Registration)
स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी https://startupmahakumbh.org/ या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करता येईल. प्रवेशासाठीच्या पासचे शुल्क 500 रुपयांपासून ते 20 हजार रुपयांपर्यंत आहे.
प्रत्येक पाससोबत विविध सुविधा जसे की परिषद प्रवेश, बी2बी नेटवर्किंग, गुंतवणूकदार लाउंज आणि जेवण समाविष्ट आहे. ठी 4 आणि 5 एप्रिल रोजी सर्वसामान्यांसाठी स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये प्रवेश विनामूल्य असेल.