Tonga earthquake | दक्षिण पॅसिफिक क्षेत्रात (South Pacific earthquake) भूकंपांच्या घटनांची मालिका सुरूच असून, टोंगा (Tonga Earthquake) बेटांवर 7.1 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप पांगाई गावाच्या दक्षिणेस सुमारे 90 किलोमीटर अंतरावर नोंदवण्यात आला.
भूकंपानंतर न्युए बेटासाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता. अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सेंटरच्या माहितीनुसार, न्युए आणि टोंगाच्या काही किनारपट्टी भागांमध्ये समुद्राच्या पातळीपेक्षा 0.3 ते 1 मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता होती. मात्र, नंतरच्या अपडेटमध्ये त्सुनामीचा (Tsunami warning Tonga) धोका टळल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
टोंगाच्या प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. टोंगा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने फेसबुकवर जारी केलेल्या सूचनेत सांगितले आहे की, “सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.”
सध्या तरी या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
टोंगामधील भूकंप आणि ‘रिंग ऑफ फायर’
टोंगा हा दक्षिण पॅसिफिकमधील एक पॉलिनेशियन द्वीपसमूह असून, येथे 170 हून अधिक बेटे आहेत.टोंगामध्ये भूकंप येणे ही एक सामान्य बाब आहे. सुमारे १ लाख लोकसंख्या असलेला हा कमी उंचीचा द्वीपसमूह भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ‘रिंग ऑफ फायर’ या पट्ट्यात येतो. हा पट्टा आग्नेय आशियातून पॅसिफिक महासागरापर्यंत पसरलेला आहे आणि येथे भूगर्भीय हालचाली मोठ्या प्रमाणात होत असतात.
दरम्यान, नुकतेच म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. या भूकंपात म्यानमारमधील 1700 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजारांपेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत.