Shubhanshu Shukla | भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (Group Captain Shubhanshu Shukla) हे Ax-4 मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station – ISS) प्रवास करणारे पहिले भारतीय अंतराळवीर (Indian astronaut) ठरणार आहेत. ते मे 2025 मध्ये अमेरिकेतील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून SpaceX Dragon यानाद्वारे उड्डाण करतील.
शुक्ला हे भारतीय हवाई दलातील अनुभवी वैमानिक असून, या मिशनमध्ये पायलट म्हणून कार्यरत असतील. त्यांची निवड भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी (Gaganyaan Mission) देखील झाली आहे. 14 दिवसांच्या या अंतराळ प्रवासात ते सूक्ष्म गुरुत्वाकर्षणावर विविध वैज्ञानिक प्रयोग करतील आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होतील. विशेष म्हणजे, अंतराळात भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा सादर करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
Launch Update 🚀
— NASA Space Operations (@NASASpaceOps) April 2, 2025
Axiom Mission 4 (Ax-4), the fourth private astronaut mission to the @Space_Station, is targeted to launch no earlier than May 2025 from @NASAKennedy in Florida.
Learn more about private astronaut missions: https://t.co/YxrgiAActD pic.twitter.com/Zuapfgorwd
या Ax-4 मिशनचे (NASA -Ax-4 mission) नेतृत्व अनुभवी नासा अंतराळवीर पेगी व्हिटसन करणार आहेत. त्यांच्यासोबत पोलंडचे सवोज उझ्नान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे मिशन विशेषज्ञ म्हणून सहभागी होतील. 1984 मध्ये राकेश शर्मा (Rakesh Sharma) अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते, आणि आता शुभांशू शुक्ला ISS वर जाणारे पहिले भारतीय ठरणार आहेत.
NASA, Axiom Space आणि इस्रो यांच्या संयुक्त सहकार्यामुळे खासगी अंतराळ प्रवासाला चालना मिळत आहे. या ऐतिहासिक संधीबद्दल बोलताना शुभांशू शुक्ला म्हणाले, “मी जरी एकटा अंतराळात जात असलो, तरी हा 1.4 अब्ज भारतीयांचा प्रवास आहे.”
या मिशनमुळे भारताची अंतराळ संशोधनातील उपस्थिती आणखी भक्कम होईल आणि भविष्यातील पिढ्यांना अंतराळ विज्ञानासाठी प्रेरणा मिळेल. प्रक्षेपणाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.