SBI Net Banking Problem | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांना काल (1 एप्रिल) पुन्हा एकदा इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सेवांमध्ये तांत्रिक अडथळ्यांचा सामना करावा लागला. या महिन्यात दुसऱ्यांदा झालेल्या आलेल्या या समस्येमुळे देशभरातील ग्राहकांना अडचणी आल्या असून, व्यवहार अयशस्वी होण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर नोंदवल्या गेल्या.
मोबाईल बँकिंग (SBI internet Banking) सेवांवर मोठा परिणाम
डाऊनडिटेक्टरच्या अहवालानुसार, मंगळवारी सकाळी 11:00 ते 11:30 या वेळेत SBI च्या मोबाईल बँकिंग समस्यांमध्ये मोठी वाढ झाली. नोंदवलेल्या तक्रारींपैकी 64% समस्या मोबाईल बँकिंगशी, 33% निधी हस्तांतरणाशी आणि 3% एटीएम सेवांशी संबंधित होत्या. अनेक ग्राहकांनी सोशल मीडियावर व्यवहार फसल्याच्या आणि खात्यात लॉगिन करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या.
एनपीसीआयचे स्पष्टीकरण
दरम्यान, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. “आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात काही बँकांना व्यवहारांमध्ये तांत्रिक समस्या जाणवत आहेत. मात्र, UPI प्रणाली सुरळीत सुरू आहे आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आम्ही संबंधित बँकांसोबत कार्यरत आहोत,” असे NPCI ने निवेदनात म्हटले आहे.
याआधीही ग्राहकांना झाला होता त्रास
यापूर्वीही 11 मार्च रोजी SBI च्या ग्राहकांना 4 तासांहून अधिक काळ UPI आणि मोबाईल बँकिंग सेवांमध्ये अडचणी आल्या होत्या. त्यावेळी बँकेने निवेदन जारी करून समस्या दूर झाल्याचे जाहीर केले होते, मात्र अडचणीचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नव्हते.
आरबीआयचा बँकांना इशारा
अशा वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणी रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. यासाठी बॅकएंड प्रणालीमध्ये आवश्यक त्या गुंतवणुकीसाठीही आरबीआय आग्रह धरत आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
SBI च्या सेवा पुन्हा ठप्प झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली असून, बँकेने यावर लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.