कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने सॉफ्टवेअरशी संबंधित क्षेत्रात मोठा बदल दिसून आला आहे. यामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यातच आता झोहोचे संस्थापक श्रीधर वेंबू यांच्या मते AI पुनरावृत्ती होणाऱ्या कार्यांना स्वयंचलित करून 90% प्रोग्रॅमिंगचे काम स्वतः करेल. तर, OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी या बदलामुळे भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची (software engineers) गरज कमी होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली आहे.
श्रीधर वेंबू यांच्या मते, बहुतेक कोडिंगची कामे AI हाताळेल, कारण प्रोग्रॅमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पुनरावृत्ती असते. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “जेव्हा लोक म्हणतात ‘AI 90% कोड लिहील’ तेव्हा मी त्या मताशी सहमत असतो. तसेच, AI अनपेक्षित जटिलता दूर करण्यास सक्षम आहे, पण मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी मानवी कौशल्य आवश्यक राही, असे देखील ते म्हणाले.
ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी देखील अशाच प्रकारचे मत व्यक्त केले आहे. सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये AI ची वाढती भूमिका भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची मागणी कमी करू शकते, असे सॅम ऑल्टमन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, हा बदल त्वरित घडणार नाही. प्रत्येक सॉफ्टवेअर इंजिनिअर काही काळासाठी खूप जास्त काम करू शकेल. मात्र, त्यानंतर त्यांची भूमिका कमी होत जाईल.
ऑल्टमन यांनी स्पष्ट केले की AI सॉफ्टवेअर डेव्हल्पमेंटची संकल्पना बदलत आहे. पूर्वी कोडिंग कौशल्य स्पर्धात्मक वाढ देत असे, पण आता AI टूल्समध्ये प्राविण्य मिळवणे ही नवीन गरज बनली आहे. सध्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे AI टूल्सचा प्रभावी वापर शिकणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
अनेक कंपन्यांमध्ये आधीच 50% पेक्षा जास्त कोड AI द्वारे लिहिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात एआयमुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना नोकरी गमवावी लागणार का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.