Ranveer Allahbadia | ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ (India’s Got Latent) शोमुळे वादाच्या केंद्रस्थानी आलेला प्रसिद्ध पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) याने नुकताच यूट्यूबवर (Youtuber) एक व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांशी संवाद साधला. या व्हिडिओत त्याने आपल्या कठीण काळात साथ दिलेल्या समर्थक, हितचिंतक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्याने हा कालावधी आयुष्यातील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक असल्याचे सांगितले.
“तुमच्या सकारात्मक संदेशांमुळे या कठीण काळात मला आणि माझ्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला. ऑनलाईन द्वेष, धमक्या आणि मीडियातील अनेक लेखांचा सामना करताना तुमच्या पाठिंब्याने खूप मदत झाली,” असे रणवीर म्हणाला.
‘बीअरबायसेप्स’ नावाने ओळखला जाणारा रणवीर याने टीकेचा स्वीकार करत हा आत्मपरिक्षणाचा कालावधी होता, असे म्हटले. त्याने सांगितले की, सतत कंटेंट तयार करताना विश्रांती घेतली नव्हती, पण या फेजमुळे प्रवासाचा पुनर्विचार करण्याची संधी मिळाली.
“गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने व्हिडिओ पोस्ट करत होतो. पण या ब्रेकमुळे शांतता अनुभवता आली आणि मला जाणवले की अनेक लोक मला कुटुंबाचा भाग मानतात. त्यांच्यापर्यंत योग्य संदेश पोहोचवण्याची जबाबदारी आता अधिक जाणीवपूर्वक पार पाडेन,” असे त्याने स्पष्ट केले.
या व्हिडिओद्वारे त्याने जबाबदार कंटेंट तयार करणार असल्याचे म्हटले. “आता मी अधिक जबाबदारीने काम करेन. लहान मुलांसह अनेक जण आमचा शो पाहतात, आणि त्याचा योग्य प्रभाव पडावा यासाठी मी प्रयत्नशील राहीन,” असे त्याने नमूद केले.
यासोबतच, त्याने आपल्या टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, कठीण प्रसंगांमध्ये एकाही सदस्याने त्याला सोडले नाही. “माझ्या 300 सहकाऱ्यांप्रती आणि त्यांच्या कुटुंबांप्रती माझी जबाबदारी आहे. मला पुन्हा एक संधी द्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा,” असे त्याने चाहत्यांना आवाहन केले.
पॉडकास्टिंगवरील प्रेम व्यक्त करत त्याने जाहीर केले की ‘द रणवीर शो’ (The Ranveer Show) लवकरच पूर्वीप्रमाणे आठवड्यातून चार एपिसोडसह परत येणार आहे. “हा संपूर्ण ब्रेक एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे,” असे तो म्हणाला.
व्हिडिओच्या शेवटी त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानत सांगितले, “आता माझे कामच बोलेल. तुम्हाला लवकरच ‘द रणवीर शो’मध्ये एक नवीन रणवीर पाहायला मिळेल!”