Vladimir Putin on Greenland | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत परतल्यानंतर ग्रीनलँड (Greenland) आणि कॅनडा ताब्यात घेणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर ग्रीनलँड आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले होते. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
अमेरिकेने ग्रीनलँडवर ताबा मिळवला तरी रशियाला त्यावर कोणतीही हरकत नाही, असे वक्तव्य पुतिन यांनी केले आहे. मुर्मांस्क शहराच्या दौर्यादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आर्क्टिक प्रदेश अमेरिकेचा भाग असल्याचा दावा केला होता. सध्या आर्क्टिक प्रदेश अधिकृतपणे डेन्मार्कचा भागआहे. हा प्रदेश स्वायत्त क्षेत्रामध्ये येतो, म्हणजेच येथे डेन्मार्कच्या प्रशासनापेक्षा वेगळी व्यवस्था चालते.मात्र, आता पुतिन यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा ग्रीनलँडविषयी चर्चा सुरू झाली आहे.
पुतिन म्हणाले की, अमेरिका ग्रीनलँड संदर्भातील अत्यंत गांभीर्याने काम करत आहे. अमेरिकेचा उद्देश आर्क्टिक प्रदेशातील आपली पकड मजबूत करणे आहे.
पुतिन यांच्या मते, हा मुद्दा पूर्णपणे अमेरिका आणि ग्रीनलँड यांच्यातील आहे आणि रशिया या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. तसेच, जगभरात ट्रम्प यांच्या विस्तारवादी धोरणावर सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ग्रीनलँडचे भविष्य नशिबावर सोडून द्यावे, असे म्हटले.
राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले, अमेरिकेची ग्रीनलँडसंबंधीची योजना गंभीर आहे. या योजनांना खोल ऐतिहासिक मुळे आहेत. हे स्पष्ट आहे की अमेरिका आर्क्टिक प्रदेशात आपले भू-राजकीय, लष्करी, राजकीय आणि आर्थिक हितसंबंध सातत्याने पुढे नेत राहील.दरम्यान, पुतिन यांनी हे वक्तव्य केल्याने रशियाने एकप्रकारे अमेरिकेला ग्रीनलँड ताब्यात घेण्यासंदर्भात मूकसंमती दिल्याची चर्चा रंगली आहे.