छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या प्रशांत कोरटकरला काल अटक करण्यात आली. कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आले होते. आज त्याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणून त्याची वैद्यकीय चाचणी केली आणि नंतर त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सुनावणीदरम्यान न्यायालयाबाहेर शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती आणि त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता देखील होती. तथापि, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

महिन्याभरापासून प्रशांत कोरटकर फरार होता. कोल्हापूर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. अखेर, पोलिसांनी त्याला तेलंगणामधून अटक केली.

सुनावणीदरम्यान सरकार वकिलांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, परंतु आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद केला की, पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. अखेर, न्यायाधीश एस.एस. तट यांनी प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.