‘Airfare Vigil’ App To Address Flyers’ Grievances | मागील काही महिन्यात विमान तिकीट दरात अचानक वाढ करण्यात आल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आता संसदीय समितीने (Parliamentary Panel) अशाप्रकारांची तक्रार नोंदवण्यासाठी Airfare Vigil मोबाईल ॲप विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
निवडणूक आयोगाकडून नागरिकांना निवडणुकीशी संदर्भातील तक्रार नोंदवण्यासाठी cVIGIL ॲप उपलब्ध करण्यात आले आहे. याच धर्तीवर मनमानी विमान भाडेवाढीच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि विमान वाहतूक क्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्यासाठी संसदीय समितीने ॲप (Airfare Vigil App) तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
संसदेच्या परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीविषयक स्थायी समितीने ग्राहक हक्कांबाबत जागरूकता वाढवण्याची आणि अवाजवी विमान भाडेवाढ रोखण्यासाठी अधिक प्रभावी नियामक प्रणाली लागू करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे.
संसदीय समितीने ‘Airfare Vigil’ नावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या निर्मितीची शिफारस केली आहे. याद्वारे नागरिक अनावश्यक विमान भाडेवाढीबाबत तक्रारी नोंदवू शकतील. प्रवासी तिकीटांच्या किंमतींचे स्क्रीनशॉट आणि संबंधित तपशील अपलोड करू शकतील.
हे ॲप रिअल-टाइम जिओ-टॅगिंग, स्वयंचलित तक्रार ट्रॅकिंग आणि वेळेत निवारणाची प्रणाली प्रदान करेल, ज्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित केली जाईल. तक्रार नोंदविल्यानंतर, प्रवाशांना एक युनिक आयडी मिळेल, ज्याद्वारे ते आपल्या तक्रारीच्या स्थितीचा पाठपुरावा करू शकतील.
समितीने अहवालात ‘एअरफेअर विजिल’ या प्लॅटफॉर्मला ‘एअरप्राईस गार्डियन’ नावाच्या एआय-आधारित प्रणालीसोबत जोडण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. याद्वारे तक्रारींची दखल घेऊन वेळेत कारवाई करण्यास मदत होईल. तसेच, समितीने शिफारस केली आहे की, DGCA ला अर्ध-न्यायिक अधिकार दिले जावेत, ज्यामुळे ते अवाजवी भाडेवाढ करणाऱ्या विमान कंपन्यांवर तात्पुरती दरमर्यादा लागू करण्याची किंवा दंड आकारण्याची कारवाई करू शकतील.