Myanmar earthquake | म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या विध्वंसक भूकंपांमुळे (Myanmar earthquake) मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक इमारती कोसळल्या असून रस्त्यांवर भेगा पडल्या आहेत. दुर्दैवाने, या दुर्घटनेत अनेक शेकडो लोकांना प्राण गमावले असून, अनेक नागरिक जखमी झाले आहेत.
संकटाच्या या काळात भारताने (India Extends Support To Myanmar) तत्परता दाखवत म्यानमारला तातडीची मदत पाठवण्यास सुरुवात केली आहे. ‘ऑपरेशन ब्रह्मा’ (Operation Brahma) अंतर्गत 15 टनांहून अधिक सामग्रीची पहिली मदत यांगून येथे पोहोचली.
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या मदत कार्याची माहिती सोशल मीडियावर दिली. त्यांनी सांगितले की, “‘ऑपरेशन ब्रह्मा’ (India Launches Operation Brahma) अंतर्गत म्यानमारला मानवतावादी मदत पुरवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मदत पहिसामग्री यांगून विमानतळावर पोहोचली आहे.”
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी ‘एक्स’वर माहिती देताना नमूद केले की, भारत हा भूकंपग्रस्त म्यानमारला मदतीचा पहिला हात पुढे करणारा देश ठरला आहे. या मदतीमध्ये तंबू, ब्लँकेट, स्लीपिंग बॅग, रेडी-टू-ईट फूड पॅकेट्स, स्वच्छता किट, जनरेटर आणि अत्यावश्यक औषधांसह 15 टन सामग्रीचा समावेश आहे.
या मदत पॅकेजमध्ये तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तंबू, थंडीपासून बचावासाठी स्लीपिंग बॅग आणि ब्लँकेट, तयार अन्न, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर, स्वच्छतेसाठी हायजीन किट, प्रकाशासाठी सौर दिवे, वीजपुरवठ्यासाठी जनरेटर सेट आणि पॅरासिटामोल, अँटीबायोटिक्स, सिरिंज, हातमोजे आणि पट्ट्या यांसारखी अत्यावश्यक औषधे यांचा समावेश आहे.
दरम्यान, म्यानमारमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दूतावासाच्या माहितीनुसार, या भूकंपात कोणत्याही भारतीय नागरिकाला इजा झाल्याचा अहवाल नाही.
थायलंडमधील परिस्थितीचा आढावा घेताना भारतीय दूतावासाने ‘एक्स’वर माहिती दिली की, बँकॉक आणि इतर भागांत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्यानंतर दूतावास थाई अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे. सुदैवाने, थायलंडमध्येही कोणत्याही भारतीय नागरिकाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचल्याची नोंद नाही. तथापि, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत थायलंडमधील भारतीय नागरिकांनी +66 618819218 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. बँकॉक येथील भारतीय दूतावास आणि चियांग माई येथील वाणिज्य दूतावासातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपाबद्दल चिंता व्यक्त करत भारताकडून शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले होते.