कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आघाडीची कंपनी OpenAI ने 40 बिलियन डॉलरचा निधी उभारण्याचा मोठा करार केला आहे. सॉफ्टबँकच्या नेतृत्वाखाली झालेल्या या गुंतवणुकीमुळे OpenAI चे एकूण मूल्यांकन 300 बिलियन डॉलरवर पोहोचले असून, ती जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी टेक कंपनी बनली आहे.
या यादीत पहिल्या स्थानावर इलॉन मस्क यांच्या SpaceX ($350 बिलियन) आणि दुसऱ्या क्रमांकावर TikTok ची मूळ कंपनी ByteDance ($315 बिलियन) आहे. OpenAI ने गुंतवणूकदारांच्या या नव्या निधीचा उपयोग AI संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी करण्याची घोषणा केली आहे.
कसा मिळणार हा निधी?
हा निधी दोन टप्प्यांत दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 बिलियन डॉलर त्वरित वितरित केले जातील, तर उर्वरित 30 बिलियन डॉलर 2025 च्या अखेरीस OpenAI ला मिळतील. या भांडवलामुळे कंपनीच्या तांत्रिक विकासाला गती मिळणार आहे.
OpenAI चा प्रवास आणि यश
2015 मध्ये स्थापन झालेली OpenAI सुरुवातीला एक नफा न कमावणारी संस्था होती. मात्र, कंपनीने मर्यादित नफ्याच्या मॉडेलचा अवलंब करत व्यावसायिक विस्तार केला आणि जगभरातील लाखो ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचवली. विशेषतः, ChatGPT हे OpenAI चे उत्पादन सध्या 500 मिलियनहून अधिक यूजर्समध्ये लोकप्रिय आहे.
फेब्रुवारी महिन्यात काही गुंतवणूकदारांनी OpenAI वर अधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सॅम ऑल्टमन ( Sam Altman) यांनी स्पष्ट शब्दांत कंपनी विक्रीसाठी नसल्याचे सांगितले. नव्या गुंतवणुकीमुळे OpenAI च्या भविष्यातील योजनांना मोठी चालना मिळणार आहे.
टेक क्षेत्रात OpenAI चे वर्चस्व वाढणार?
या गुंतवणुकीमुळे OpenAI जागतिक स्तरावर सर्वाधिक मूल्यांकन असलेल्या टेक कंपन्यांच्या यादीत वरच्या स्थानावर पोहोचली आहे. पुढील काही वर्षांत OpenAI कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात नवे आयाम गाठणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.