National Women’s Day 2025: दरवर्षी 13 फेब्रुवारीला भारतात राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण नेत्या, प्रसिद्ध कवयित्री आणि महिला हक्क पुरस्कर्त्या सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
‘भारताच्या गानकोकिळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू यांचे योगदान केवळ साहित्यापुरते मर्यादित नाही. हा दिवस महिलांच्या सशक्तीकरणाची, लैंगिक समानतेची आणि सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आवश्यकतेची आठवण करून देतो.
राष्ट्रीय महिला दिन 2025 सरोजिनी नायडू यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण भूमिकेला, महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याला आणि इतर अनेक क्षेत्रांतील योगदानाला सन्मान देतो. राष्ट्रीय महिला दिन विविध क्षेत्रातील महिलांच्या यशाचा गौरव करण्याची तसेच महिलांच्या सशक्तीकरणाला, लैंगिक समानतेला आणि नेतृत्वाला पाठिंबा देण्याची आठवण करून देतो.
सरोजिनी नायडू यांच्याविषयी माहिती
सरोजिनी नायडू यांना ‘भारताच्या गानकोकिळा’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी झाला. सरोजिनी नायडू यांचा जन्म हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील अघोरणाथ चट्टोपाध्याय वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ होते, तर त्यांची आई बारादा सुंदरी देवी साहित्यप्रेमी होत्या.
सरोजिनी नायडू अतिशय हुशार विद्यार्थी होत्या आणि त्यांनी मद्रास विद्यापीठाच्या मॅट्रिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला. वयाच्या 16व्या वर्षी त्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या आणि किंग्ज कॉलेज, लंडन तसेच गिर्टन कॉलेज, केंब्रिज येथे शिक्षण घेतले.
सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य लढ्यात देखील सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली. 1942 मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. 1925 मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या होत्या. त्यानंतर त्या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल देखील बनल्या. 2 मार्च 1949 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे त्यांच्या निधन झाले.