मुंबई ते दुबई (Mumbai to Dubai Train) हा दोन शहरातील प्रवास ट्रेनच्या माध्यमातून अवघ्या 2 तासात शक्य झाला तर? वाचतानाही अशक्य वाटणारी ही गोष्टी लवकरच साध्य होण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि भारत यांच्यातील दळणवळण सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
मुंबई आणि दुबई यांना जोडणाऱ्या समुद्राखालील हाय-स्पीड रेल्वे (high-speed train) प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. संयुक्त अरब अमिरातीतील नॅशनल ॲडव्हायझर ब्युरो लिमिटेड या संस्थेने या प्रकल्पाची संकल्पना मांडली असून, या रेल्वे मार्गाद्वारे दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होऊ शकतो.
हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाची संकल्पना
प्रस्तावित हा रेल्वे मार्ग ताशी 600 ते 100 किमी वेगाने धावणाऱ्या हाय-स्पीड ट्रेनसाठी डिझाइन करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई आणि दुबई दरम्यानची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, या प्रकल्पाच्या मंजुरीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
युट्युबवरील एका चॅनेलने या प्रस्तावाचा व्हिडिओ शेअर करत समुद्राखालील रेल्वे मार्ग कसा दिसेल हे दाखवण्यात आले आहे. मात्र, तांत्रिक गुंतागुंत आणि प्रचंड खर्च लक्षात घेता, हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल का, याबाबत साशंकता आहे.
हवाई प्रवासाला पर्याय? व्यापाराला गती मिळणार?
जर हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात आला, तर तो हवाई प्रवासाला मोठी स्पर्धा देऊ शकतो. प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त कच्च्या तेलासह इतर वस्तूंची जलद वाहतूक सहज शक्य होईल. यामुळे भारत आणि यूएई दरम्यान व्यापार संबंध अधिक बळकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2030 पर्यंत प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता
या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास 2030 पर्यंत हा रेल्वे मार्ग सुरू होऊ शकतो, असे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, अद्याप हा प्रकल्प चर्चेच्या आणि व्यवहार्यता तपासणीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात उतरेल की फक्त संकल्पनाच राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.