MPSC पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात आली, 385 रिक्त जागा भरणार; पाहा संपूर्ण माहिती

MPSC Recruitment 2025 | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025 (MPSC Prelims 2025) ची जाहिरात अखेर प्रसिद्ध केली आहे. मागील अनेक दिवसांपासून उमेदवारांकडून जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी केली जात होती. अखेर आयोगाने 385 रिक्त जागा भरण्यासाठी पूर्व परीक्षा 2025 ची (MPSC Recruitment 2025) जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

यावर्षीपासून राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आधीप्रमाणेच असला तरीही मुख्य परीक्षेत मोठा बदल करण्यात आला आहे. यूपीएसचीच्या धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने देखील मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

385 जागा भरल्या जाणार

नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025 अंतर्गत एकूण 385 रिक्त पदे भरली जातील. राज्य सेवेसाठी 127, महाराष्ट्र वन सेवेसाठी 144 आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेतील 114 पदांचा समावेश आहे. पुढे या पदांमध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे. या अंतर्गत विविध संवर्गातील 35 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.

MPSC पूर्व परीक्षा 2025 शी संबंधित महत्त्वाच्या तारखा

MPSC पूर्व परीक्षा 2025 चा अर्ज भरण्याची प्रक्रिया 28 मार्च 2025 पासून सुरू होईल. उमेदवार 17 एप्रिलपर्यंत अर्ज भरू शकतील. तर बँक चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2025 आहे. MPSC पूर्व परीक्षा ही 28 सप्टेंबर 2025 ला राज्यभरातील 37 जिल्ह्यातील केंद्रांवर आयोजित केली जाईल.

अर्ज प्रक्रिया व अर्ज शुल्क

इच्छुक व पात्र उमेदवार MPSC च्या अधिकृत वेबसाइटवरून 28 मार्च 2025 पासून अर्ज करू शकतात. अर्ज भरताना अमागास वर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 544 रुपये, तर मागासवर्गीय/आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग यांच्यासाठी शुल्क 344 रुपये आहे.

उमेदवार वय व शैक्षणिक पात्रतेसंदर्भात अधिक माहितीसाठी MPSC च्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पाहू शकतात.