Raj Thackeray : गंगा प्रदूषण ते औरंगजेबाची कबर, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडली; या मुद्यांवर केले भाष्य

Raj Thackeray Speech | गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. कुंभमेळा, औरंगजेबाची कबर, मराठा आरक्षण, संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून ते लाडकी बहीण योजनेपर्यंत अशा विविध मुद्यांवर त्यांनी मत व्यक्त केले.

गंगा नदीच्या प्रदुषणाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, गंगा साफ करायला हवी असे पहिल्यांदा राजीव गांधी म्हणाले होते. आता पंतप्रधान मोदीही तेच सांगत आहेत. मात्र, येथे आंघोळ करणारे अनेकजण आजारी पडले. प्रश्न कुंभमेळ्याचा अपमान करण्याचा किंवा गंगेचा अपमान करण्याचा नाही. प्रश्न पिण्याचा पाण्याचा आहे. आपल्या नद्या स्वच्छ राहायलाच पाहिजे. धर्माच्या नावाखाली नद्या बरबाद करत आहोत. आपल्या धर्मात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे म्हणत त्यांनी गंगा नदीच्या प्रदुषणाचा एक व्हिडिओ देखील दाखवला.

या सभेत बोलताना राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, ‘औरंगजेबाच्या कबरीवरची सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर ठेवा व एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथे गाडले. हा आमचा इतिहास आहे.’ 

चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाही. विकी कौशल मेल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान समजले का? असा प्रश्न देखील त्यांनी केला.

यावेळी लाडकी बहीण योजनेवर देखील त्यांनी मत व्यक्त केले. लाडकी योजना बंद होणार असल्याचे ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार होते. तसे केल्यास वर्षाला सरकारवर 63 हजार कोटी रुपयांचे कर्ज होईल. म्हणजे 5 वर्षात 3 ते 4लाख कोटी कर्ज. हे फक्त वाटण्यासाठीचे कर्ज आहे हीही योजना बंद होणार. कर्ज काढून कोणी दिवाळी साजरी करायला सांगत आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी इतर मुद्यांवर देखील भाष्य केले.