MF Husain Painting | प्रसिद्ध भारतीय चित्रकार एम. एफ. हुसैन (MF Husain) यांच्या एका कलाकृतीने लिलावात इतिहास रचला आहे. त्यांच्या एका पेटिंगसाठी लिलावात तब्बल 13.8 दशलक्ष डॉलरची (सुमारे 118 कोटी रुपये) बोली लागली. ही आतापर्यंत कोणत्याही आधुनिक भारतीय कलाकृतीला (expensive modern Indian art) लिलावात मिळालेली सर्वाधिक किंमत आहे.
एम. एफ. हुसैन (MF Husain Painting) यांच्या ‘अनटाइटल्ड (ग्राम यात्रा)’ या पेटिंगसाठी न्यूयॉर्कमधील क्रिस्टीज येथे लिलाव पार पडला. एका अज्ञात संस्थेने हे पेटिंग खरेदी केले. या पेटिंगची अंदाजित किंमत 25 लाख ते 35 लाख डॉलर होती, परंतु पेटिंग अपेक्षेपेक्षा चारपट अधिक किंमतीला विकले गेले.
यापूर्वी हुसैन यांचे सर्वात महागडे पेटिंग ‘अनटाइटल्ड (रीइनकार्नेशन)’ होते. हे सप्टेंबर 2023 मध्ये 31 लाख डॉलर (सुमारे 26 कोटी रुपये) ला लिलावात विकले गेले होते. 118 कोटी रुपयात लिलाव झालेल्या पेटिंगची निर्मिती एम. एफ. हुसैन यांनी 1954 मध्ये केली होती. पेंटिंग सुमारे 14 फूट लांब आहे आणि यात भारतीय गावांचे 13 वेगवेगळे दृश्य (विन्येट्स) दाखवण्यात आले आहेत. तब्बल 70 वर्षांनंतर प्रथमच ही कलाकृती सार्वजनिक लिलावासाठी सादर करण्यात आली.
दरम्यान, याआधी आधुनिक भारतीय कलाकृतींसाठी सर्वात महागड्या पेटिंगचा विक्रम अमृता शेरगिल यांच्या ‘द स्टोरी टेलर (1937)’ या कलाकृतीच्या नावावर होता. हे पेटिंग सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत 74 लाख डॉलर (अंदाजे 63 कोटी रुपये) ला विकले गेले होते. त्याचप्रमाणे, एस. एच. रजा यांचे 1959 मधील ‘कल्लिस्ते’ हे चित्र मार्च 2023 मध्ये 56 लाख डॉलरला विकले गेले होते.