आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामाला वेग, शासनाकडून आदेश जारी

छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) भव्य स्मारक आग्रा येथे उभारणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत माहिती दिली होती. आता या संदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आला आहे. हे स्मारक (memorial of Chhatrapati Shivaji Maharaj in Agra) उभारण्याची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली आहे. 

पर्यटन विभाग हा नोडल विभाग म्हणून कार्यवाही करेल व महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ हे कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून कार्य करेल.तसेच, स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ, जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन केली जाणार आहे.

पर्यटन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आग्रा येथे जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाने आग्रा किल्ल्याजवळील एका ऐतिहासिक स्थळावर हे स्मारक उभारण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा सुरू असून, जमीन संपादनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज 1666 मध्ये आग्रा किल्ल्यातून औरंगजेबाच्या कैदेतून साहसीरित्या सुखरूप परतले होते. ही घटना इतिहासात अजरामर झाली आहे. या घटनेची आठवण म्हणून हे स्मारक उभारले जाणार आहे. अनेक पर्यटक शिवरायांना ज्या ठिकाणी कैदेत ठेवले होते, त्या ठिकाणाला भेट देतात. मात्र, सध्या तेथे कोणती वास्तू नाही. आता सरकारद्वारे ती जागा अधिग्रहीत करून तेथे भव्य स्मारक उभारले जाणार आहे.

हे स्मारक केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे स्मरण करणार नाही, तर पर्यटनालाही चालना देईल. या स्मारकात शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रदर्शन, त्यांच्या काळातील शस्त्रास्त्रांचे संग्रह आणि एक सांस्कृतिक केंद्र असेल. या स्मारकामुळे आग्रा येथील पर्यटनाला नवीन आयाम मिळेल आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची कहाणी देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचेल.