Maharashtra Weather Update | गेल्याकाही दिवसात महाराष्ट्रातील हवामानात (Maharashtra Weather) मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. उष्णतेची लाट वाढत आहे. तसेच, काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) लातूर, नांदेड, सोलापूर आणि धाराशिव येथे वादळांसह पावसाचा इशारा जारी केला आहे.
याशिवाय, विदर्भात जोरदार वारे आणि वादळी परिस्थिती दिसण्याची शक्यता आहे. राज्यात काही भागातील तापमान वाढण्याची शक्यता आहे. काही भागात 39 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
याआधी IMD ने होळीच्या नंतर तापमानात वाढ होईल असा अंदाज वर्तवला होता. परंतु काही भागांमध्ये अनपेक्षित पावसामुळे तापमानात घट दिसून आली. मात्र, आता अवकाळी ढगाळ वातावरण दूर होत असताना राज्यभर पुन्हा उष्णतेत वाढ होताना दिसत आहे.
IMD नुसार, आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे. नांदेड, धाराशिव आणि लातूरसह काही क्षेत्रांमध्ये विजांचा कडकडाट आणि 30-40 किमी/तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात वाऱ्याचा वेग 40-50 किमी/तासापर्यंत वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वादळी पावसाची शक्यता आहे.
परभणी, नागपूर, धुळे, अकोला, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, सांगली आणि भंडारा या भागांमध्ये तापमान 39 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. सतत ढगाळ परिस्थितीमुळे आर्द्रता वाढत आहे. पुण्यात (Pune Weather Update) तापमान आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, तर मुंबईत तापमानाची स्थिती तुलनेने स्थिर आहे.
लातूर, नांदेड, सोलापूर आणि धाराशिव या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात विजांसह पावसाची शक्यता आहे. तापमान वाढत असल्याने बाहेर पडताना नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.