राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा; 1 एप्रिलपासून नवे वीज दर लागू

Electricity Rates Reduced | राज्यातील घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 1 एप्रिलपासून त्यांच्या वीजबिलात घट होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण (Mahavitaran power tariffs), टाटा (Tata), अदानी (Adani) आणि बेस्ट (Best) या प्रमुख वीज वितरण कंपन्यांच्या नवीन वीज दरांना मंजुरी दिली आहे.

नवीन दरानुसार, महावितरण आणि अदानी कंपनीच्या वीजदरात सरासरी 10 टक्के, टाटा कंपनीच्या दरात 18 टक्के तर बेस्टच्या वीजदरात 9.82 टक्के घट होईल. पुढील 5 वर्षात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांद्वारे स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने हे दर कमी होणार आहेत.

स्मार्ट मीटर (टीओडी) बसवणाऱ्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांना दिवसा (सकाळी 9 ते सायंकाळी 5) आणि रात्री (रात्री 12 ते सकाळी 6) वीज वापरल्यास 10 ते 30 टक्के सवलत मिळेल. मात्र, सायंकाळी 5 ते रात्री 12 या वेळेतील वीज वापरासाठी त्यांना 20 टक्के अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

कृषी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यावरील क्रॉस सबसिडीचा भार पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने कमी केला जाईल, ज्यामुळे त्यांचे वीजदरही कमी होतील. पर्यटनाला चालना देण्यासाठी निवासी हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस यांना वाणिज्यिक ऐवजी औद्योगिक ग्राहक श्रेणीत समाविष्ट करण्यात आले असून, त्यामुळे त्यांचे वीजबिल लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

दरम्यान, ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’तील ग्राहकांना दिवसा निर्माण होणाऱ्या अतिरिक्त वीजेची वजावट आता कोणत्याही वेळी त्यांच्या वीज वापरातून मिळेल. यापूर्वी सायंकाळच्या वेळेत ही वजावट मिळणार नसल्याचे प्रस्तावित होते, ज्याला जोरदार विरोध झाला होता. त्यामुळे या योजनेतील ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच लाभ मिळत राहील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष संजय कुमार आणि सदस्य आनंद लिमये व सुरेंद्र बियाणी यांनी अनेक सुनावण्यांनंतर या नवीन वीज दरांना मंजुरी दिली. कृषी वगळता इतर सर्व ग्राहकांसाठी टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असून, औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना प्राधान्य दिले जाईल. स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना सौर ऊर्जा निर्मितीच्या काळात (सकाळी 9 ते सायंकाळी 5) वीज वापरल्यास प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.

विविध कंपन्यांचे नवीन वीज दर (घरगुती ग्राहक)

  • महावितरण: 0-100 युनिट्स: 4.43 रु., 101-300 युनिट्स: 9.64 रु., 301-500 युनिट्स: 12.83 रु., 500+ युनिट्स: 14.33 रु.
  • अदानी: 0-100 युनिट्स: 6.38 रु., 101-300 युनिट्स: 9.63 रु., 301-500 युनिट्स: 11.03 रु., 500+ युनिट्स: 11.98 रु.
  • टाटा: 0-100 युनिट्स: 4.76 रु., 101-300 युनिट्स: 4.76 रु., 301-500 युनिट्स: 13.55 रु., 500+ युनिट्स: 14.55 रु. (व्हेरिएबल दर)
  • बेस्ट: 0-100 युनिट्स: 3.84 रु., 101-300 युनिट्स: 7.43 रु., 301-500 युनिट्स: 11.91 रु., 500+ युनिट्स: 14.11 रु.