‘लोकशाही मार्गाने कलाकाराला कसे मारायचे?’, कुणाल कामराच्या नवीन पोस्टची जोरदार चर्चा

Kunal Kamra Post | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची कथित खिल्ली उडवल्याने अडचणीत आलेल्या स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराची (Kunal Kamra) सोशल मीडियावरील नवीन पोस्ट चर्चेत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत कलाकारांना दडपण्याच्या ‘लोकशाही’ पद्धतीबाबत त्याने मत व्यक्त केले आहे. ‘लोकशाही मार्गाने कलाकाराला कसे मारायचे’ असे लिहित त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये संताप, धमक्या आणि संस्थात्मक दबावाचा वापर करून कलाकारांना कशाप्रकारे गप्प केले जाते, याविषयी त्याने भाष्य केले आहे. 

कुणाल कामराने नवीन पोस्टमध्ये काय लिहिले आहे?

आपल्या पोस्टमध्ये कुणालने कलाकारांना शांत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘लोकशाही’ मार्गांची एक यादीच दिली आहे. ‘लोकशाही मार्गाने कलाकाराला कसे मारायचे’ असे शीर्षक देत त्याने ही पोस्ट केली आहे. त्याने लिहिले की,

  1. आधी संताप व्यक्त करा—इतका की ब्रँड्स त्यांच्यासोबत काम करणं थांबवतील.
  2. थोडा अधिक दबाव टाका—जोपर्यंत खासगी आणि कॉर्पोरेट स्तरावरील शो मिळेनासे होत नाहीत.
  3. निषेध अधिक वाढवा—मोठ्या इव्हेंट व्हेन्यूजना धोका वाटू लागेल.
  4. हिंसेची धार वाढवा—म्हणजे अगदी लहान ठिकाणीही कार्यक्रम होऊ शकणार नाहीत.
  5. प्रेक्षकांवरही दडपशाही करा—त्यांना चौकशीसाठी बोलवा, जेणेकरून कला मंचच गुन्हेगारीचा भाग वाटू लागेल.

यामुळे कलाकारांसमोर फक्त दोनच पर्याय उरतात—आपला आत्मा विकून कोणाच्यातरी हातचे बाहुले बनणे किंवा शांत बसून कलात्मक अस्तित्व गमावणे. हे केवळ काही स्टेप्स नाहीत, तर एक राजकीय हत्यार आहे—कलाकारांना गप्प बसवण्याची एक मशीन आहे.

नक्की प्रकरण काय?

दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना कुणालने कथितरित्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याने एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता ‘गद्दार’ असा उल्लेख केला होता. यामुळे संतापलेल्या शिवसेना समर्थकांनी त्याच्या शोचे चित्रीकरण केलेल्या स्टुडिओ आणि ज्या हॉटेलमध्ये तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याची तोडफोड केली.

सध्या, कुणालला मद्रास उच्च न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला आहे, ज्यामुळे त्याला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.