कुणाल कामरा युट्यूबवरून वादग्रस्त व्हिडिओ हटवणार? T-Series कडून तक्रार

Kunal Kamra Slammed T-Series | स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) पुन्हा एकदा वादात अडकला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे तो वादात अडकला आहे. एकीकडे या प्रकरणी पोलिसांकडून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे, तर दुसरीकडे टी-सीरिज (T-Series) कंपनीने व्हिडिओमध्ये कॉपीराइट उल्लंघन करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

कुणालने युट्यूबवर रिलीज केलेल्या त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये (Kunal Kamra Viral Video) मिस्टर इंडिया चित्रपटातील हवा हवाई गाण्याची पॅरोडी सादर केली आहे. यावरून टी-सीरिजने कॉपीराइट उल्लंघन केल्याचे म्हणत नोटीस बजावली आहे.

टी-सीरिजने तक्रार केल्याने युट्यूबने व्हिडिओची व्हिजिबिली आणि मॉनिटायजेशन ब्लॉक केले आहे. याबाबतची माहिती स्वतः कुणाल कामराने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली. त्याने पोस्टमध्ये टी-सीरिजला टॅग करत लिहिले की, कठपुतली बनणं थांबवा. पॅरोडी आणि व्यंग्य कायदेशीरदृष्ट्या फेअर यूज अंतर्गत येते. मी गाण्याचे मूळ बोल किंवा मूळ संगीत वापरलेले नाही. 

जर तुम्ही हा व्हिडिओ हटवला, तर प्रत्येक कव्हर साँग किंवा डान्स व्हिडिओ देखील हटवला जाऊ शकतो. सर्व क्रिएटर्सने याची नोंद घ्यावी. यासोबतच, भारतातील प्रत्येक एकाधिकार हा माफियापेक्षा कमी नाही. त्यामुळे हा स्पेशल व्हीडिओ हटवण्यापूर्वी कृपया पाहा किंवा डाउनलोड करा., असेही कुणाल कामरा म्हणाला.

दरम्यान, कुणालने त्याच्या व्हीडिओमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे गायले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला. कुणालने जेथे हा कार्यक्रम सादर केला त्या हॅबिटेट स्टुडिओची शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती.