PM Narendra Modi Foreign Trips Cost | गेल्या तीन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या परदेश दौऱ्यांवर सुमारे 259 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सरकारने राज्यसभेत दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावरील (Modi Foreign Trips) खर्चाबाबत प्रश्न विचारला होता. खरगे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी ही माहिती दिली.
2022 ते 2024 या कालावधीत पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi Foreign Trips Cost) एकूण 38 परदेश दौरे केले. यामध्ये अमेरिका, जपान आणि इतर अनेक देशांचा समावेश आहे. पबित्रा मार्गेरिटा यांनी सांगितले की, 2022 मध्ये मोदींनी 8 देश, 2023 मध्ये 10 देश आणि 2024 मध्ये 16 देशांना भेटी दिल्या. या तीन वर्षांत त्यांनी एकूण 34 देशांचे दौरे केले, यापैकी काही देशांना त्यांनी दोन किंवा अधिक वेळा भेट दिली. यमध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, यूक्रेन, सिंगापूर, ब्राझील, गुयानासह अनेक देशांचा समावेश आहे.
पबित्रा मार्गेरिटा यांनी पंतप्रधान मोदींच्या मे 2022 मध्ये जर्मनीपासून सुरू झालेल्या आणि डिसेंबर 2024 मध्ये कुवेतमध्ये संपलेल्या 38 हून अधिक परदेश दौऱ्यांची माहिती दिली आहे.आकडेवारीनुसार, जून 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर 22,89,68,509 रुपये खर्च करण्यात आला, तर सप्टेंबर 2024 पुन्हा त्यांनी अमेरिकेला भेट दिली होती. त्यावेळी हा खर्च 15,33,76,348 रुपये होता. याशिवाय, इतर देशांच्या दौऱ्यासाठीही कोट्यावधी रुपये खर्च आला.
पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांदरम्यान पाच प्रमुख बाबींवर खर्च करण्यात आला. यामध्ये निवास व्यवस्था, वेन्यू शुल्क, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक आणि अन्य आवश्यक गोष्टींचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या 38 परदेश दौर्यांवर एकूण सुमारे 259 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
सरकारने 2014 च्या आधीच्या तीन वर्षांतील पंतप्रधानांच्या परदेश भेटींची माहितीही दिली आहे. आकडेवारीनुसार, 2011 मध्ये अमेरिका दौऱ्यासाठी 10 कोटी 74 लाख 27 हजार 363 रुपये खर्च झाले. त्याचबरोबर, 2013 मध्ये रशिया भेटीवर 9 कोटी 95 लाख 76 हजार 890 रुपये खर्च झाले. 2011 मध्ये फ्रान्सला भेट देण्यासाठी 8 कोटी 33 लाख 49 हजार 463 रुपये, तर 2013 मध्ये जर्मनी दौऱ्यासाठी 6 कोटी 2 लाख 23 हजार 484 रुपये खर्चले गेले होते.