जपानमध्ये भूकंप आल्यास किती मोठे नुकसान होणार? भीतीदायक आकडेवारीचा अंदाज, सरकारचा रिपोर्ट आला समोर

Japan’s new report warns ‘megaquake’ | म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या भूकंपामध्ये हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यातच आता जपानमध्येही भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, भूकंप आल्यास किती मोठे नुकसान होऊ शकते, याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जपानमध्ये (Japan earthquake) लवकरच महाविनाशकारी भूकंप (‘मेगाक्वेक’) आणि त्सुनामी येण्याची शक्यता असून, यामुळे सुमारे 2 लाख 98 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच 2 ट्रिलियन डॉलरपर्यंतचे आर्थिक नुकसान होऊ शकते, असा नवा अंदाज जपान सरकारने सोमवारी जाहीर केला.

सरकारच्या माहितीनुसार, नानकाई ट्रफ परिसरात वाढलेल्या भूगर्भीय हालचालींमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 2011 च्या विनाशकारी भूकंप (Japan megaquake) व त्सुनामीनंतर जपानने आपत्ती व्यवस्थापनाचे नियम अधिक कठोर केले होते. मात्र, संभाव्य ‘मेगाक्वेक’च्या स्थितीत देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 10 टक्के म्हणजेच 12 लाख 30 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागण्याची शक्यता आहे.

नानकाई ट्रफ – भूकंपाचा केंद्रबिंदू?

ऑगस्ट 2024 मध्ये जपानने (Japan Fearing a Megaquake) नानकाई ट्रफ परिसरात संभाव्य ‘मेगाक्वेक’साठी मार्गदर्शक सूचना जारी केली होती. शिझुओका ते क्यूशूपर्यंत 900 किलोमीटर पसरलेली ही भूगर्भीय फॉल्ट लाईन अत्यंत संवेदनशील मानली जाते. याठिकाणी फिलीपीन सी प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली सरकत आहे, ज्यामुळे 9.1 तीव्रतेपर्यंतचा भूकंप होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, जपान सरकारच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 30 वर्षांत नानकाई ट्रफमध्ये 8 ते 9 तीव्रतेचा भूकंप येण्याची 70-80 टक्के शक्यता आहे. इतिहास पाहता, या परिसरात दर 100-200 वर्षांनी मोठे भूकंप आले आहेत, तर 1946 मध्ये येथे मोठा भूकंप झाला होता.

भूकंपानंतर त्सुनामीचा धोका

या भूकंपानंतर काही मिनिटांतच 30-34 मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता आहे. शिझुओका, कोची आणि वाकायामा यांसारख्या किनारपट्टीच्या भागांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्सुनामीमुळे 2.15 लाख, इमारती कोसळल्याने 73 हजार, तर आगीमुळे 9 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो.