IPL 2025 : स्पीड गनही झाली फेल! आयपीएलमधील सर्वात स्लो बॉल? मुंबईच्या ‘या’ खेळाडूच्या बॉलिंगची सर्वत्र चर्चा

Satyanarayana Raju | आयपीएल 2025 च्या (IPL 2025) कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT vs MI) मुंबई इंडियन्सवर 36 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 8 विकेट्स गमावत 20 षटकांत 196 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित षटकांत 160 धावांपर्यंतच मजल मारू शकला  

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज सत्यनारायण राजू (Satyanarayana Raju) त्याच्या खास स्लो बॉलिंगमुळे चर्चेत राहिला. आंध्र प्रदेशच्या 25 वर्षीय या खेळाडूने गुजरातच्या डावातील 13 व्या षटकात जॉस बटलरला एका अनोख्या स्लो बॉलने चकित केले. या चेंडूचा वेग स्पीड गनवरही नोंदवला गेला नाही. चेंडू इतका हळू होता की बटलरला तो सहज पुल करून चौकार मारता आला. हा शॉर्ट पिच चेंडू होता, पण गतीमुळे बटलरला व्यवस्थित पोजिशन घेता आली. या स्लोअर बॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सत्यनारायण राजूने (Satyanarayana Raju) याआधी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएल पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने एका षटकात 13 धावा दिल्या होत्या, तरीही गुजरातविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याला संधी मिळाली. 

गुजरातविरुद्ध सत्यनारायण राजूने पहिल्या षटकात 13 आणि डेथ ओव्हर्समध्ये 19 धावा दिल्या. गुजरातच्या फलंदाजांनी त्याच्या स्लो बॉल्सवर जोरदार फटकेबाजी केली मात्र, त्याला डावातील शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली आणि त्याने अफगाणिस्तानच्या स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खानला बाद केले. त्याने 3 षटकांत 40 धावा देत 1 विकेट घेतली.

दरम्यान, गुजरातच्या फलंदाजांमध्ये साई सुदर्शनने सर्वाधिक 63 धावा केल्या, तर जॉस बटलरने 39 धावांचे योगदान दिले. मुंबईच्या गोलंदाजांमध्ये हार्दिक पांड्याने 2 बळी घेतले. मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात खराब झाली. सूर्यकुमार यादवने 48 आणि तिलक वर्माने 39 धावा केल्या, पण इतर फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 बळी घेत मुंबईला 160 धावांवर रोखले.  या सामन्यात मुंबईचा 36 धावांनी पराभव झाला.