100% प्लेसमेंटसह IIM Mumbai ची दमदार कामगिरी, विद्यार्थ्यांना मिळाले 47.5 लाखांपर्यंतचे पॅकेज

IIM Mumbai achieves 100% placement | शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तात्काळ नोकरी मिळणे आवश्यक असते. परंतु अनेकदा शिक्षणानंतरही उत्तम नोकरीसाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागते. मात्र, आयआयएम मुंबईच्या (IIM Mumbai) 2025 च्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचे नोकरीचे ऑफर मिळाली आहे.

आयआयएम मुंबईने यंदा 100 टक्के प्लेसमेंट (IIM Mumbai placement) साध्य केले आहे. याचा अर्थ, या वर्षी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्त झाली आहे. या विद्यार्थ्यांना वार्षिक 47.5 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे.

आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज तिवारी यांनी सांगितले की, यंदा नोकरीच्या ऑफर्समध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच, सरासरी पगारपॅकेजात 5 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

या प्लेसमेंट प्रक्रियेत 198 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. टॉप 10 टक्के विद्यार्थ्यांना सरासरी 47.5 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले. टॉप 20 टक्के विद्यार्थ्यांना 41.2 लाख, तर टॉप 50 टक्के विद्यार्थ्यांना 34.1 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले.

फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर क्षेत्रातील प्लेसमेंटमध्ये 130 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. रिटेल आणि ई-कॉमर्स क्षेत्रात 47.73 टक्के, तर कन्सल्टिंग क्षेत्रात 28.92 टक्के वाढ दिसून आली.

या प्लेसमेंटमध्ये अॅक्सेंचर ही कंपनी सर्वाधिक भरती करणारी ठरली. कंपनीने 41 विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर्स दिल्या आणि सरासरी 45.37 लाखांचे वार्षिक पॅकेज दिले. त्यानंतर PwC इंडिया (18 ऑफर्स) आणि PwC यूएस अॅडव्हायजरी (10 ऑफर्स) यांचा क्रमांक लागतो. याशिवाय, अल्वारेझ & मार्सल, ऑफबिझनेस, प्रॅक्सिस ग्लोबल अलायन्स, व्होडाफोन आयडिया, वर्कडे आणि ZS या नामांकित कंपन्यांनीही प्लेसमेंटमध्ये भाग घेतला होता.