CA final exams | इंस्टिट्यूड ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) चार्टर्ड अकाउंटंसी (CA) परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल जाहीर केला आहे. 2025 पासून CA अंतिम परीक्षा (CA Final exams) दरवर्षी तीन वेळा घेतली जाणार आहे. आतापर्यंत ही परीक्षा दरवर्षी दोन वेळा होत असे.
यापुढे सीए अंतिम परीक्षा वर्षातून तीनदा होणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांना अधिक संधी देण्यासाठी आणि परीक्षेच्या प्रणालीला अधिक लवचिक बनवण्यासाठी ICAI द्वारे घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी ICAI ने (Institute of Chartered Accountants of India) इंटरमिजिएट आणि फाउंडेशन परीक्षा दरवर्षी तीन वेळा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर आता CA फायनल परीक्षेलाही या नव्या संरचनेत (CA examination system) समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल—या तिन्ही स्तरांच्या परीक्षांना दरवर्षी समान संधी मिळणार आहे.
ही परीक्षापद्धती अधिक नियोजित आणि सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी आता या परीक्षा जानेवारी, मे आणि सप्टेंबर महिन्यात घेतल्या जातील.
याशिवाय, ICAI ने पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स इन इन्फॉर्मेशन सिस्टिम्स ऑडिट परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल केला आहे. पूर्वी ही परीक्षा जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जात होती, मात्र आता ती दरवर्षी फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर अशा तीन वेळा आयोजित केली जाणार आहे.
आयसीएआय सीए मे 2025 परीक्षा वेळापत्रक
सीए इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांच्या तारखा काहि दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आल्या आहेत. सीए इंटरमिजिएट ग्रुप 1 परीक्षा 3, 5 आणि 7 मे 2025 रोजी होणार असून, ग्रुप 2 परीक्षा 9, 11 आणि 14 मे 2025 रोजी घेतली जाईल.
त्याचप्रमाणे, सीए फायनल ग्रुप 1 ची परीक्षा 2, 4 आणि 6 मे 2025 रोजी होणार आहे, तर ग्रुप 2 ची परीक्षा 8, 10 आणि 13 मे 2025 रोजी आयोजित केली जाणार आहे.